मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच भूमिका जाहीर करणार : छत्रपती संभाजीराजे
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण तापायला लागले असतानाच आता छत्रपती संभाजीराजे यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच भूमिका मांडणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता संभाजीराजे आरक्षणासाठी सामोपचाराची का सरकारविरुद्ध एल्गार करण्याची भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्दबादल ठरवले होते. न्यायालयाच्या निकालानंतर तात्काळ प्रतिक्रिया देतेवेळी संभाजीराजे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली होती. केंद्र व राज्य सरकार दोघांनीही मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. राज्य सरकारने प्रयत्नांमध्ये कुठेही कसर ठेवली नाही. त्यामुळे आता केंद्र व राज्य सरकारने मिळून यावर मार्ग काढावा, असे संभाजीराजे यांनी सुचविले होते.
मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण सातत्याने तापताना दिसत आहे. मराठा नेत्यांनी राज्यभरात मोर्चे काढण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळे राज्य सरकारवर दबाव वाढायला सुरुवात झाली आहे. अशावेळी छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.