मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नारायण राणे यांना नुकताच फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी अमित शाह यांनी नारायण राणे यांची विचारपूस केली. तसेच पोलीस कारवाई आणि अटकेचा कारवाईबाबतचे तपशीलही अमित शाह यांनी नारायण राणे यांना विचारल्याचे समजते. भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आता भाजप नारायण राणे यांच्यावरील कारवाईचा वचपा काढण्यासाठी कोणते पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे गोत्यात आलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सध्या भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून फोन आणि भेटीगाठी घेऊन आश्वस्त केले जात आहे. यापूर्वी राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचे समर्थन केले होते. आम्ही नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी केलेल्या विधानाशी सहमत नाही. मात्र, एक पक्ष म्हणून भाजप त्यांच्या पाठिशी असल्याचे फडणवीस यांनी सांगितले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील त्याचीच री ओढली होती. याशिवाय, बुधवारी दिवसभरात भाजपच्या नेत्यांकडून नारायण राणे यांना समर्थन देणारी वक्तव्ये करण्यात आली होती. या सगळ्यातूनच भाजपने आपण नारायण राणे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचा संदेश दिल्याची चर्चा आहे.