मुंबई : राज्याच्या पोलीस खात्यात आणि राजकारणात खळबळ माजवलेल्या खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेने आज परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्याविरोधात आज पहिलं दोषारोपपत्र दाखल केलंय. या प्रकरणात आतापर्यंत ३६ साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेत. एसीपी संजय पाटील यांनी वाझे आणि परमबीर यांच्याविरोधात जबाब दिलाय. त्या जबाबात काही खळबळजनक खुलासे त्यांनी केले आहेत. त्यामुळे एसीसीपी पाटील यांचा जबाब अत्यंत महत्वाचा मानला जात आहे.
एसीपी पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे बार आणि हॉटेल मालक यांच्या मिटिंगवेळी सचिन वाझेने त्यांना सांगितलं होतं की, १ नंबर परमबीर सिंग हेच आहेत. १ नंबर म्हणजे परमबीर सिंग असा जबाब वाझेबरोबरच एसीपी संजय पाटील यांनीही दिला आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे. बार चालकांकडून सचिन वाझे आणि परमबीर सिंह यांनी मोठ्या प्रमाणात खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे.
गोरेगाव खंडणी प्रकरणात गुन्हे शाखेच्या हाती ६९ ऑडिओ क्लीप लागल्या आहेत. ज्या खंडणी प्रकरणाशी संबंधित आहेत. या सर्व ऑडिओ क्लीप एका पेनड्राईव्हमध्ये एकत्र करून त्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात आली आहे. गुन्हे शाखेने मुंबई पोलीस दलातील आतापर्यंत ७ पोलीस अधिकाऱ्यांचे गोरेगाव खंडणी प्रकरणात जबाब नोंदवलेत. अधिकाऱ्यांनी वाझे खंडणी रॅकेट कसे चालवत होता, कोणावर कारवाई करायची? कोणावर नाही? याच्या कशा प्रकारे सूचना देत होता हेही सांगितले आहे. मुंबईतल्या बुकींची नावे आणि माहिती वाझेने काही अधिकाऱ्यांकडे मागितली होती. त्यापैकी काही बुकींवर कारवाई करू नये, अश्या सूचना वाझेने दिल्या होत्या. त्यामुळे आता तरी हे प्रकरण वाझे आणि परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढवणार हे निश्चित झालं आहे. यात आणखी कुणाची नावं समोर येतात? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.