मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी २५ समित्यांचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या शुक्रवारी रात्री उशिरा जाहीर केल्या. यामध्ये निवडणूक संचालन समितीच्या अध्यक्षपदी आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भाजपच्या संचलन समितीच्या अध्यक्षपदी निवड होताच आशिष शेलार आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करत एकप्रकारे शिवसेनेला आव्हान दिले आहे.
गेली २५ वर्षे मुंबईकर भोगत असलेल्या यातनांचा आता कडेलोट झालाय..बदल व्हायलाच हवाय.. लढाई आता सुरु! चला मुंबईकर जिंकण्यासाठी आपण लढू!! असे ट्विट आशिष शेलार यांनी केले आहे. दरम्यान, गेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप असा अटीतटीचा सामना पाहायला मिळाला होता. त्यात शिवसेनेने विजय मिळवला. यामुळे आता आशिष शेलारांच्या या टि्वटला शिवसेना आता काय उत्तर देणार, याकडे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, आशिष शेलार यांच्याकडे निवडणूक संचलन समिती अध्यक्ष जबाबदार दिली आहे. या समितीत राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, प्रकाश मेहता, नितेश राणे हे सदस्य असणार आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे २०१७ च्या मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला ८० च्या वर जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे यावेळी देखील भाजपने त्यांच्याकडे निवडणूक संचलन समिती अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप आता आमने सामने ठाकले आहेत.
आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत दोन टर्म नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. मुंबईतील राजकीय, सामाजिक समीकरणांची त्यांना चांगली माहिती आहे. शहराच्या प्रश्नांची उत्तम जाण आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे मुंबई सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते.
२०१२ मध्ये मुंबई महापालिकेत भाजपचे ३१ नगरसेवक निवडून आले होते. त्यावेळी भाजपची शिवसेनेसोबत युती होती. त्यानंतर २०१७ मध्ये ही युती तुटली. दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. आशिष शेलारांच्या नेतृत्त्वात भाजपचे ८२ उमेदवार निवडून आले. भाजपने शिवसेनेला तुल्यबळ लढत दिली. शिवसेनेच्या ८४ जागा निवडून आल्या होत्या. शिवसेनेने कशीबशी सत्ता राखली. मात्र भाजपने शिवसेनेला चांगलाच घाम फोडल्याचे या निवडणुकीत दिसून आले होते. त्यामुळे आगामी निवडणूक दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.