नागपूर : राज्यातील संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या विदर्भातील विधान परिषदेच्या नागपूर, अकोला-वाशीम-बुलढाणा स्थानिक संस्था मतदार संघामध्ये भाजपने बाजी मारली आहे. नागपूरमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसने पाठिंबा दिलेले उमेदवार मंगेश देशमुख यांचा पराभव केला, तर अकोला-वाशीम-बुलढाणा स्थानिक संस्था मतदार संघामध्ये भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत. विधान परिषदेच्या ६ जागांपैकी ४ जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्या आहेत. ६ पैकी ४ जागा भाजपला, तर शिवसेना, काँग्रेसला प्रयेकी एक जागा मिळाली आहे. मुंबईतून शिवसेनेचे सुनील शिंदे, भाजपचे राजहंस सिंह, कोल्हापुरातून काँग्रेसचे सतेज पाटील, तर नंदुरबारमधून भाजपचे अमरीश पटेल बिनविरोध निवडून आले आहेत.
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक संस्था मतदार संघामध्ये एकूण ५५४ मतदार असलेल्या या मतदानामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना ३६२ मते मिळाली, काँग्रेसने पाठिंबा दिलेले मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी नाकारली होती. दोन वर्षांच्या राजकीय विजयनावासानंतर भाजापाने आता नागपूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली होती. तर काँग्रेसने आधी छोटू भोयर यांना उमेदवारी दिली होती. तर नंतर ऐनवेळी उमेदवार बदलून मंगेश देशमुख यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्याचा काँग्रेसला फायदा मिळाला नाही.
या मतदानासाठी भाजपाकडे ३१८ मते होती. मात्र बावनकुळे यांना प्रत्यक्षात ३६२ मते मिळाली. भाजपा उमेदवार बावनकुळेंना त्यांच्याकडे असलेल्या मतांच्या कोट्यापेक्षा तब्बला ४४ मते अधिक मते मिळातील. म्हणजेच महाविकास आघाडीची ४४ मते फोडण्यात भाजपला यश आले. तर मंगेश देशमुख यांना १८६ मते मिळाली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार छोटू भोयर यांना केवळ एक मत मिळाले.
दरम्यान, या विजयानंतर प्रतिक्रिया देताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, मी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानत. मला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानतो. काँग्रेसचा आज झालेला पराभव हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पराभव आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असा टोला बावनकुळे यांनी लगावला.
अकोल्यात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया पराभूत
अकोला वाशिम बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया आणि भाजपचे वसंत खंडेलवाल यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत भाजपचे वसंत खंडेलवाल हे विजयी झाले आहेत.वसंत खंडेलवाल यांना ४३८, तर शिवसेनेच्या गोपिकिशन बाजोरिया यांना ३२८ मतं मिळाली आहेत.
अकोला – बुलडाणा – वाशिम विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपच्या दोन्ही उमेदवारांकडे स्पष्ट बहुमत नव्हते. अकोला – बुलडाणा – वाशिम या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना यंदा रंगला आहे. भाजप आणि शिवसेना या निवडणुकीच्या निमित्तानं पहिल्यांदा समोर आले होते. वसंत खंडेलवाल हे नितीन गडकरींचे निकटवर्तीय मानले जातात. वसंत खंडेलवाल यांचा तीन जिल्ह्यातील जनसंपर्क त्यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरला आहे. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांच्या विजयामुळं मतमोजणी केंद्रावर जमलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. निराश झालेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्र सोडलं आहे. शिवसेनेचे गोपिकिशन बाजोरिया हे गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघाचे आमदार होते. १८ वर्षानंतर भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. नागपूर आणि अकोला वाशिम बुलडाणा येथील पराभवामुळं महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
हा तर नाना पटोलेंचा पराभव; विजयानंतर बावनकुळेंचा टोला
विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी यावेळी काँग्रेसवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आपण आज मिळवलेला विजय हा नाना पटोले यांचा पराभव आहे. या निवडणुकीत काँग्रेसने घोडेबाजार केला. मला ३६२ मते मिळाली. त्यात ४४ मते जास्त पडली. मी सर्वांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रियाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
बावनकुळे म्हणाले की, या निवडणुकीत त्यांनी आणि महाविकास आघाडीने पैशांचा अक्षरशः घोडेबाजार मांडला होता. त्यांनी पदाचा गैरवापर केला. नाना पटोले यांच्या मोगलाईमुळेच काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशी जोरदार टीका त्यांनी यावेळी केली. बावनकुळे पुढे म्हणाले की, मी पक्षाचे दहा वर्षे काम केले आहे. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे त्यांचा पराभव झाला. काँग्रेसच्या हुकमशाही काँग्रेसचा पराभव झाला, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.