हप्ते वसुली तुम्ही करणार, मग केंद्राला दोष का देता? चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला सवाल
मुंबई : राज्यातील ठाकरे सरकार प्रत्येक समस्येसाठी केंद्र सरकारलाच जबाबदार धरणार असेल तर ते राज्य तरी का चालवत आहेत? त्यांनी राज्य हे केंद्राच्याच ताब्यात देऊन टाकावे. हप्ते वसुली तुम्ही करणार, मग केंद्राला दोष का देता, असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ठाकरे सरकारला केला. मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
मुंबईत गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा आगामी 15 दिवसांत सरकारच्या आणखी दोन-तीन मंत्र्यांचा राजीनामा घेण्याची वेळ येईल, असे म्हटले. मी अमित शाह किंवा तपास यंत्रणांच्या संपर्कात आहे, म्हणून मला ही माहिती मिळते असे नव्हे, तर हा महाराष्ट्रातील सामान्य लोकांचा एक अंदाज आहे. क्रिकेटमध्ये जसं सुरुवातीचे दोन फलंदाज बाद व्हायला वेळ लागतो. त्यानंतर पुढचे पटापट फलंदाज ढेपाळतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
सचिन वाझे यांनी अनिल परब यांच्यावर पत्र लिहून आरोप केल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याविषयी शंका उपस्थित करत आहेत. मात्र, हेच सचिन वाझे कालपर्यंत सरकारला प्रिय होते. अधिवेशनाचा एक मिनिटही बहुमूल्य असतो. मात्र, याच सचिन वाझे यांना पदावरून दूर करण्यासाठी अधिवेशन नऊवेळा तहकूब करावे लागले, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
राज्याचे नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलीस दलातील संघाशी संबंधित अधिकाऱ्यांचा शोध घेतला जाईल, असे वक्तव्य केले होते. त्याला चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे का? लातूरचा भूकंप असो किंवा कोल्हापुरातील पूरपरिस्थिती प्रत्येकवेळी संघ मदतीसाठी धावला आहे. तुमच्या राजकीय वादात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ओढू नका, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.