चंद्रकांत पाटलांचा कोल्हापुरी शैलीत संजय राऊतांवर हल्लाबोल
मुंबई: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर खास कोल्हापुरी शैलीत जोरदार टीका केली. आरं बाबा ज्याची तुला भीती नाही, ते वारंवार कशाला बोलतो, अशी जोरदार टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टीका केली होती. जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असं राऊत म्हणाले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास कोल्हापुरी शैलीतच राऊतांचा समाचार घेतला. आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.
भाजपच्या दोन नेतृत्वाने देशाला विकलं या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. या देशाच्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की, कोणी कोणाला काही म्हणू शकतो. त्यामुळे वडेट्टीवार यांचं ते मत आहे. शेवटी राजकारणात कुणाला मतं मिळतं, कुणाचं सरकार येतं यावर ठरत असतं. तुमचं सरकार काही लोकांनी मतं देऊन आलेलं नाही. तुम्ही गिमिक करून सत्तेत आला आहात. मोदी लोकांनी मत दिल्याने आले आहेत. तुम्ही मोदींवर बोलून काय होतंय, असा चिमटा त्यांनी काढला. वडेट्टीवार हे देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे आपलं मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. मोदींनी देशाला पुढे नेलं की खड्ड्यात घातलं हे लोकं ठरवतील. मतपेट्यातून ते दिसतंच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.