कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप नेते आणि खा. संभाजीराजे छत्रपती यांच्यात वाद होताना दिसतो आहे. भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. केला गेलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही असही पाटील म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली पण संभाजीराजे छत्रपतींना मोदींनी भेट दिलेली नाही. त्यावर खुद्द संभाजीराजेंनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. विरोधकांनी याच नाराजीचा फायदा उठवत भाजपवर टीका सोडलीय. त्याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात हे वक्तव्य केलं आहे.
अहमदाबादमध्ये खा. संभाजी छत्रपतींंच्या सन्मानार्थ मोदींसह सर्वजण उभे राहीले. एवढच नाही तर शाहुंच्या वंशजांना पक्ष कार्यालयात बोलावू नका असही मोदी म्हणाल्याचा चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सध्या संभाजी छत्रपती हे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यात ठिकठिकाणी भेटीगाठी करतायत. त्यात एक वेळेस त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर मी खासदारकीही सोडायला तयार असल्याचं म्हणाले. विशेष म्हणजे खा. संभाजी छत्रपतींना भाजपनं राज्यसभेवर पाठवलेलं आहे. संभाजी छत्रपतींचं खासदारकी सोडण्याचं वक्तव्य भाजपविरोधी म्हणून पाहिलं जातं आहे. तेव्हापासूनच भाजप आणि संभाजी छत्रपती यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरु झालीय. एवढच नाही तर संभाजी छत्रपती हे मोदीविरोधी भूमिका घेतायत का? अशी चर्चाही सध्या होती आहे. चंद्रकांत पाटील यांनीही संभाजीराजे व्यक्ती म्हणून काय करतात त्याचं त्यांना स्वातंत्र्य असल्याचं म्हणाले. आमच्याकडून त्यांच्याबद्दल अपशब्द निघणार नाही. एवढच नाही तर नेतृत्व करणाऱ्यासोबत पक्ष झेंडा बाजुला ठेऊन आम्ही सहभागी होणार असंही पाटलांनी सांगितलं.
संभाजीराजे छत्रपती सोलापुरात आले असता पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी थेट राजीनामा द्यायला तयार असल्याचं बोलून दाखवलं होतं. राजीनाम्याने जर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तात्काळ राजीनामा देईन, असं असं ते म्हणाले होते. संभाजीराजेंच्या राजीनाम्याच्या विधानानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन भाजप खासदार संभाजी छत्रपती महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेत आहेत.