नवी दिल्लीः भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यांनी अमित शाह यांना भाजपच्या राज्यातील संघटनात्मक कामाची माहिती दिली. राज्याच्या सहकार क्षेत्रातील विशेषतः साखर उद्योगातील महत्वाच्या विषयांबाबतही चंद्रकांतदादांनी अमित शाह यांना माहिती दिली. महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.
अमित शाह नोव्हेंबर अखेरीस पुण्यात येतील आणि पुणे महानगरपालिकेच्या काही नवीन प्रकल्पांचं उद्घाटनं करतील. महापालिका भवनात छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन आणि पालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण शाहांच्या हस्ते होणार अशी बातमी होती. यावेळी शाह यांच्या उपस्थितीत पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडण्यात येणार असल्याचेही म्हटलं जात आहे.
भारताचे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री. @AmitShah जी यांची राजधानी नवी दिल्ली येथे भेट घेतली.
Meeting held with Hon. Union Minister of Home Affairs & Cooperation, former BJP President Sh. Amit Shah ji in New Delhi today. pic.twitter.com/Zb6jePUdOX
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) November 25, 2021
पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. ज्यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड सारख्या राष्ट्रीय स्थरावरील प्रमुख महापालिकांचा समावेश आहे. निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेहमीच आक्रमक असतो आणि राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांचा देखील निवडणुकींच्या प्रचारामध्ये सक्रिय सहभाग असतो. मात्र सध्यस्तिथित असे दिसते आहे की अमित शाहांचा पुणे, महाराष्ट्राचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे किंवा रद्द झालाय. त्यामुळे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अमीत शाह यांना भेटण्यासाठी दिल्लीत पोहोचले असावेत.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी नगरसेवक आणि आमदारांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. बैठकीत पक्षाच्या कार्यकर्त्यांना प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना मिशन मोडवर गती देण्याचे आवाहन करण्यात आले हेते.
२०१४ च्या राज्यात विधानसभा निवडणुकीत, भाजपने पुणे शहरातील सर्व सहा जागा जिंकल्या होत्या, तर २०१७ च्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला होता. मात्र, यंदा राज्यात भाजप एकटा आहे आणि मविआ सरकारमधील तिन्ही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात भाजपसाठी यंदाची लढत कठीण आहे.