Top Newsराजकारण

राज्यातील गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष होण्यासाठी वानखेडेंवर टीका; चंद्रकांत पाटलांचा आरोप

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही, एसटी कामगारांच्या गंभीर समस्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून दररोज समीर वानखेडे यांना टार्गेट करण्यात येत आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.

एखाद्या अधिकाऱ्याची आई, पत्नी किंवा वडील यांच्यावर सतत टीका करणे समजण्या पलिकडचे आहे. आपली सर्व संबंधितांना विनंती आहे की, हा प्रकार थांबवा आणि तपासी यंत्रणांना त्यांचे काम करू द्या, असे आवाहन त्यांनी केले. गुन्ह्यात तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला धारेवर धरले की मूळ अंमली पदार्थांचा आणि गुन्ह्यावरील कारवाईचा विषय बाजूला राहतो, असे ते म्हणाले.

नवाब मलिक हे राज्याचे मंत्री आहेत व त्यांना अधिकार आहेत. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात काही असेल तर चौकशी करून शिक्षा करा. पण एखाद्या अधिकाऱ्याला सतत इतके धारेवर धरावे का, असा सवाल पाटील यांनी केला. ते म्हणाले की, केवळ नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली म्हणून वानखेडे यांना धारेवर धरले, असे प्रकरण दिसत नाही. याचे धागेदोरे अनेक वर्षापूर्वीचे असावेत आणि जुने हिशेब चुकते करणे चालू असावे, असा अंदाज आहे.

राज्यासह देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानेच पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. आघाडीच्या नेत्यांचा हा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाची पिछेहाट झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात केंद्राने सवलत दिल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला. देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या जागा ६ वरून वाढून ७ झाल्या. याखेरीज भाजपाच्या मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आले. दुसरीकडे या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची संख्या १० वरून ८ झाली. तरीही भाजपाची पिछेहाट झाल्याचा दावा करणाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button