अमरावती : राज्याच्या राजकारणात शिवसेना विरुद्ध भाजप हे चित्र अधिक गडद होताना दिसत आहे. आघाडीत बिघाडी होऊन पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युती होईल, अशी आशा काहीजणांना वाटत असते. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता शिवसेनेसोबत युती नको, अशी स्पष्ट भूमिका आज मांडली. इतकंच नाही तर राज्याच्या राजकारणातील पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा नेता म्हणून पाटील यांनी नाव न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
स्वबळावर सत्ता आणण्याची तयारी आपली चालली आहे. सत्ता येईल नक्की. यापुढे कुणी नको आपल्याला युतीमध्ये. काही प्रामाणिक पक्ष आपल्यासोबत आहेत. आरपीआय, रयत क्रांती संघटना, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, विनायक मेटेंचा शिवसंग्राम आपल्यासोबत आहेत. अजून काही छोटे-छोटे पक्ष आपल्यासोबत यायचं म्हणत आहेत. पण हे नाव मोठं आणि लक्षण खोटं आता नको. पाठीत खंजिर खुपसणारं एकच नाव महाराष्ट्राच्या राजकारणात होतं. पण आता पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा चेहरा समोर येतो, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवलाय. पाटील यांच्या या टीकेमुळं शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्र्यांना अटक करण्यात येत नाही. पहिल्यांदाच तुम्हाला बातमी देतोय. देशाच्या शिष्टाचारानुसार क्रम सांगायचा तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती , पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री यांना कोणतंही राज्य सरकार अटक करू शकत नाही. या सरकारचं गेल्या २० महिन्यात काय चाललंय? कोण यांना सल्लागार मिळाला माहीत नाही. कोर्टात ते प्रत्येक विषयावर फटके खात आहेत. तसं आता खातील, असं सांगतानाच शिवसैनिकांनी केस दाखल करणं समजू शकतो. पण अटक? मग उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नव्हते. तेव्हा पंढरपुरला मोदींना पंतप्रधान असताना चोर म्हणाले. त्याचं काय करायचं? मुख्यमंत्री असताना दसरा मेळाव्यात त्यांनी जे भाषण काढा. त्यावर किती केसेस दाखल करायच्या?, असा सवाल पाटील यांनी केला होता.