नागपूर : परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता नोटीस बजावली होती. त्यानुसार ११ च्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाही. त्यांनी ईडीकडे उपस्थित राहण्यासाठी १४ दिवसांचा अवधी मागून घेतलाय. त्यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधलाय. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. अनिल परब यांनी ईडी चौकशीसाठी हजर राहायला हवं होतं, असा टोला चंद्रकांत पाटील यांना लगावलाय.
सर्वसामान्य माणसांना लगेच अटक होते. मग अनिल परब यांनी कितीही व्यस्त असलं तरी ईडी चौकशीला हजर राहायला हवं होतं. अनिल देशमुखांचंही असंच चाललं आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरली आहे. रांगेनं एक-एक मंत्री आहे. आधी राठोड गेले, मग देशमुख आणि आता अनिल परब. मंत्र्यांची अजून मोठी यादी आहे. काही जण सुपात आहेत, तर काही जण जात्यात, असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिलाय.
ठाण्यात एका फेरिवाल्यानं महिला अधिकाऱ्याची बोटं छाटण्याचा प्रकार घडलाय. त्यावरुन चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय. राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले, पण त्यांना अजून अटक नाही. संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. तो खटला चालवायला हवा आणि संपवायला हवा. आता एक फेक केस तयार करुन त्यात क्लीन चीट मिळाली. ती केस पूजा चव्हाण केससोबत जोडून गैरसमज पसवण्याचं काम सुरु असल्याचा आरोपही पाटील यांनी केलाय. अनिल देशमुख यांच्या क्लीनचिट बाबतही असंच झाल्याचं पाटील म्हणाले.
सत्तेच्या गैरवापराबाबत सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारावे
महाविकास आघाडी सरकारमधील लोकांना ईडीचा फायदा होणार असेल वाटत असेल, तर त्यांनी पेढे वाटावे. सुप्रिया सुळे यांना असे वाटत असेल की, सत्तेचा गैरवापर या आधी इतका कधीच झाला नाही तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारा की इंदिरा गांधी यांनी सत्तेचा गैरवापर कसा केला, असा पलटवार चंद्रकांत पाटील यांनी केला.
शिवसेना ही हिंदुत्ववादी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिलेली नाही. असे असते, तर त्यांनी टिपू सुलतान जयंती साजरी केली नसती. मुख्यमंत्री जनआशीर्वाद यात्रेवर काहीही बोलू शकतात. कोकणात जनआशीर्वाद यात्रेला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांना याची दखल घ्यावी लागली, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
दरम्यान, आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असे कधीच पाहिले नाही. कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलवले जाते. ही कुठली संस्कृती आहे, अशी विचारणा करत, ते काय विचार करतात हे सांगू शकत नाही. मात्र, हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असे पाहिले नाही, हे दुर्दैवी आहे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला होता.