
चंदीगड: येत्या २०२२ मध्ये होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी शिरोमणी अकाली दल आणि बहुजन समाज पार्टीमध्ये आघाडी झाली आहे. तब्बल २५ वर्षानंतर दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे पंजाबमधील काँग्रेसच्या सत्तेसमोर तगडं आव्हान उभं राहण्याची शक्यता राजकीय सूत्रांनी वर्तवली आहे.
शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या आघाडीची घोषणा केली. पंजाबच्या राजकारणासाठी हा नवा आणि महत्त्वाचा दिवस आहे. गेल्या वर्षभरापासून अकाली दल कृषी कायद्यांविरोधात केंद्र सरकारशी लढत आहे. या मुद्द्यावर आम्ही भाजपसोबतची युतीही तोडली आहे. आता बसपासोबत युती केली असून आम्ही २० जागांवर लढणार आहोत, असं बादल यांनी सांगितलं. बसपा आणि अकाली दल मिळून पंजाबमध्ये मोठा विजय मिळवू, असा दावाही त्यांनी केला आहे. पंजाबमध्ये दलितांची संख्या देशात सर्वाधिक आहे. पंजाबमध्ये लोकसंख्येच्या ३३ टक्के दलित आहेत. त्यामुळे दलित मते आपल्याकडे खेचण्यासाठी बसपा आणि अकाली दलाने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय भाजपशी युती तोडल्यानंतर पंजाबमध्ये स्वबळावर लढणं जोखमीचं ठरणार होतं. त्यामुळेही अकाली दलाने बसपाची साथ घेतल्याचं सांगितलं जात आहे.
यापूर्वी १९९६ मध्ये म्हणजे २५ वर्षापूर्वी अकाली दल आणि बसपाची आघाडी झाली होती. त्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत या आघाडीने १३ पैकी ११ जागा जिंकल्या होत्या. यात बसपाला तीन तर अकाली दलाला १० पैकी ८ जागांवर विजय मिळाला होता. आता २५ वर्षानंतर या दोन्ही पक्षांचा राज्यातील जनाधार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष काँग्रेसला धक्का देऊ शकतात, असं सांगितलं जात आहे.
भाजप, आपशी युती नाहीच !
सुखबीर सिंग बादल यांनी गेल्याच आठवड्यात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी भाजप आणि आम आदमी पार्टी सोडून कुणाशीही आघाडी करण्यास तयार असल्याचं जाहीर केलं होतं. हे दोन पक्ष सोडून आम्ही कोणत्याही पक्षासोबत आघाडी करू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर बसपा-अकाली दल एकत्र येण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली होती.




