केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या घरात कोणाला कोरोना झाल्यास १५ दिवसांची सुट्टी
नवी दिल्ली : केंद्र सरकाने आपल्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. घरातील सदस्याला कोरोनाची लागण झाली असल्यास त्याची देखभाल करण्यासाठी कर्मचाऱ्याला स्पेशल कॅज्युअल लिव्ह देण्याची घोषणा केली आहे. जर केंद्र सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याचे पालक किंवा कुटुंबीयाला कोरोना झाल्यास १५ दिवसांची ही सुटी दिली जाणार आहे. पर्सनल मिनिस्ट्रीने याबाबतचा आदेश काढला आहे.
या आदेशामध्ये असे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या कोणत्याही कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला कोरोनाची बाधा झाली आणि त्याला जर हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज भासली तर १५ दिवसांच्या स्पेशल लिव्हनंतर त्यांना कोणत्याही प्रकारची आणखी सुट्टी मिळू शकते. हॉस्पिटलमधून कुटुंबीय डिस्चार्ज होण्यापर्यंत ते ही सुट्टी घेऊ शकतात.
कोरोना संकटात भारत सरकारच्या पर्सनल मिनिस्ट्रीने कोरोनामुळे हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यामुळे देखभाल आणि क्वारंटाईन पिरिएड आदींशी संबंधित सुट्ट्यांची अनेकांकडून माहिती मिळविली होती. यानंतर मंत्रालयाने यासंबंधी विस्तृत आदेश काढला आहे. तसेच जर कोणी कर्मचारी स्वत: कोरोना बाधित झाला असेल तर त्याला २० दिवसांची सुट्टी मिळणार आहे. होम आयसोलेशन किंवा क्वारंटाईनमध्ये राहण्यासाठी ही सुट्टी वापरता येणार आहे. जर कोणता कर्मचारी कोरोना झाल्यानंतर हॉस्पिटलाईज झाला असेल तरीदेखील त्याला २० दिवसांची कम्युटेड लिव्ह, एससीएल, अर्न्ड लिव्ह आदी मिळू शकते. यासाठी त्याला हॉस्पिटलाईज झाल्याचे पुरावे द्यावे लागणार आहेत. तसेच जर एखादा कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आला आणि त्याला होम आयसोलेशनमध्ये रहावे लागले तर त्याला सुरुवातीचे ७ दिवस ऑन ड्युटी मानले जाणार आहे.