Top Newsराजकारण

कॅप्टन अमरिंदर सिंग काँग्रेसशी फारकत घेणार

नवी दिल्ली : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यापासून पंजाबच्या राजकारणात राजीनामा सत्र सुरु झालं आहे. नुकताच पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी अध्यक्षतेचा राजीनामा दिला परंतु हायकमांडने तो फेटाळला आहे. तर आता दिल्ली दौऱ्यावर असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडणार असल्याची घोषणा केली आहे. काँग्रेस सोडणार असल्याचे कॅप्टन यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत सध्या काही ठरलं नसल्याचेही कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री असूनही नाराज असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पदाचा राजीनामा दिल्यावर आता काँग्रेसशी फारकत घेणार असल्याची घोषणा केली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये असे म्हटलं आहे की, मी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे की, यापुढे आपला अपमान सहन करणार नाही. माझ्यासोबत जी वागणूक करण्यात आली ती मी सहन करणार नाही. काँग्रेसमध्ये यापुढे राहणार नसून भाजपमध्ये प्रवेश करत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. परंतु भाजपकडून त्यांची मनधरणी करण्यात आल्यास प्रवेश करतात का? हे पाहावं लागणार आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडणार असल्याची घोषणा केल्यावर आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर देखील बदल केला आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडियावर माजी सैनिक, पंजाब माजी मुख्यमंत्री, राज्याच्या सेवेसाठी तत्पर असल्याचे लिहिले आहे.

या दरम्यान त्यांनी स्पष्ट केले की ते काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये जाणार नाहीत. अशा परिस्थितीत अमरिंदर सिंह वेगळा पक्ष स्थापन करू शकतात अशी शक्यता आहे. नव्या पक्षा संदर्भात बोलताना ते म्हणाले की, पुढील रणनीती जवळच्या लोकांशी चर्चा केल्यानंतरच तयार केली जाईल.

चंदीगडला पोहोचलेल्या अमरिंदर सिंह यांनी सिद्धू यांना लक्ष्य केले आणि म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीत जिथून (सिद्धू) निवडणूक लढतील तिथं मी त्यांना जिंकू देणार नाही. सिद्धू पंजाबसाठी योग्य नाही. ते म्हणाले की सिद्धू यांचे काम पक्ष चालवणे आहे. मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांचे काम सरकार चालवणे आहे. सरकार चालवताना कोणीही हस्तक्षेप करू नये.

कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, यांच्याशी भेट घेतली आहे. पंजाब मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावरसुद्धा पंजाब आपला असल्यामुळे जनसेवा करत राहणार असे कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button