नाशिक जिल्ह्यात ५ नगरपंचायतींसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात
नाशिकः नाशिक जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात निफाड, देवळा, पेठ, सुरगाणा आणि कळवणचा समावेश आहे. या ठिकाणी बुधवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, ती ७ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ५ नगरपंचायतींच्या प्रत्येकी १७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर बुधवारपासूनच २४ नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या नगरपंचायतीसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, २२ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
पाच नगरपंचायतींसाठी बुधवार, दि. २ डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ती ७ डिसेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर ८ डिसेंबर रोजी अर्जाची छाननी. १३ डिसेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येतील. विशेष म्हणजे रखडलेल्या दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीचीही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. येथेही २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
नगरपंचायत निवडणूक असो की, महापालिका निवडणुका. या दोन्ही निवडणुकांवर कोरोनाचे सावट मात्र कायम आहे. आता ओमिक्रॉन विषाणू आलाय. महाराष्ट्रात अजून या विषाणूचे रुग्ण सापडले नाहीत. मात्र, निवडणुका पाहता थोडा संयम पाळणे आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा या निवडणुका नक्कीच महागात पडतील यात शंका नाही. हे टाळ्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात सहभागी राहणाऱ्या प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. इतरांंनाही मास्क वापरण्याचे आवाहन करावे. सुरक्षित अंतर पाळावे आणि गावोगावी लसीकरणावर भर देण्याची गरज आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीत भवितव्य आजमावण्यासाठी अनेक तरुण इच्छुक आहेत. विशेषतः सर्वच पक्षांकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात किमान महिनाभर तरी राजकीय धुळवड रंगणार आहे. त्यानंतर लगेचच महिनाभरात फेब्रुवारीमध्ये नाशिक महापालिकेची निवडणूक रंगणार आहे. त्यामुळे आतापासूनच जिल्ह्यात राजकीय रंग भरायला सुरुवात झाली आहे.
येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. महापालिकेच्या १३३ प्रभागांसाठी ३ सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, त्यासाठी तयार केलेला कच्चा प्रभागरचना आराखडा महापालिका आयुक्तांनी निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. आता निवडणूक आयोग या आराखड्याची छाननी करेल. त्यात मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले की नाही, हे पाहून त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या सुचवण्यात येतील. येत्या १५ डिसेंबरनंतर प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.