
लंडन : भारतासमोर इंग्लंडने चौथ्या डावात विजयासाठी २०९ धावांचे लक्ष्य असताना चौथ्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुलनं सॉलिड खेळ केला परंतु ३८ चेंडूंत २६ धावा करून त्याला माघारी जावं लागलं. रोहित शर्मा व चेतेश्वर पुजारानं आणखी धक्का बसू दिला नाही. रोहित १२ व पुजारा १२ धावांवर खेळत असून टीम इंडियानं दिवसअखेर १ बाद ५२ धावा केल्या आहेत. नॉटिंग्हॅमवर इतिहास रचण्यासाठी भारताला कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी आणखी १५७ धावांची गरज आहे.
दोन दिवसांचा बहुतांश खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर चौथ्या दिवशी क्रिकेट चाहत्यांची चांदी झाली. भारत- इंग्लंड यांच्यातला पहिला कसोटी सामना रंजक वळणावर पोहोचला आहे. पहिल्या डावात १८३ धावांवर इंग्लंडला गुंडाळून भारतानं २७८ धावांसह ९५ धावांची आघाडी घेतली. ही पिछाडी भरून काढण्यात इंग्लंडची दमछाक झाली, परंतु कर्णधार जो रुटनं यशस्वी खिंड लढवताना भारतासमोर तगडे आव्हान उभे केले. जसप्रीत बुमराहनं ६४ धावांत ५ विकेट्स घेतल्या, तर मोहम्मद सिराज व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी २ बळी टिपले. चौथ्या दिवशी लक्ष्याचा पाठलाग करताना प्रत्युत्तरात भारतानं एक विकेट गमावली आहे.
रोरी बर्न्स ( १८) व डॉम सिब्ली ( २८) यांना पुन्हा एकदा मोठी खेळी करता आली नाही. झॅक क्रॅवली ( ६) याला बाद करून जसप्रीत बुमराहनं पहिल्या तीन विकेट्समधील दोन बळी टिपले. मोहम्मद सिराजनं इंग्लंडला पहिला धक्का दिला. कर्णधार रूट भारतीय गोलंदाजांसमोर पहाडासारखा उभा राहिला. चौथ्या दिवसाच्या खेळापूर्वी भारताचा माजी महान फलंदाज व्ही व्ही एस लक्ष्मण यानं विधान केलं होतं, ते म्हणजे. भारताच्या विजयात रूट हा सर्वात मोठा अडथळा ठरू शकतो. ते आज खरे ठरले. जॉनी बेअरस्टो ( ३०) यानं रूटला साथ दिली, परंतु सिराजनं त्यालाही बाद केलं.
डॅन लॉरेन्स ( २५), जोस बटलर ( १७), सॅम कुरन ( ३२) यांचीही रुटला साथ मिळाली, परंतु भारतासमोर मोठं आव्हान करण्यासाठी ती पुरेशी ठरली नाही. रूटनं १७२ चेंडूंत १४ चौकारांसह १०९ धावा केल्या आणि त्याला बुमराहनं बाद केले. बुमराहनं दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. कुरन व स्टुअर्ट ब्रॉड यांना सलग दोन चेंडूवर माघारी पाठवल्यानंतर बुमराहला हॅटट्रिकची संधी होती, परंतु जेम्स अँडरसननं त्याला यश मिळवू दिले नाही. इंग्लंडचा दुसरा डाव ३०३ धावांवर गुंडाळला गेला.




