मुंबई : संभाजी ब्रिगेड आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाद वाढणार असं दिसतंय. राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जातीय राजकारणावरुन थेट राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केलं. तसेच यासाठी इतिसाहासाचाही आधार घेतला. यानंतर आता संभाजी ब्रिगेडचे नेते ॲड. मनोज आखरे यांनी आज मुंबईत थेट राज ठाकरे यांना खुले आव्हान दिले. हिंमत असेल तर राज ठाकरे यांनी आपल्याकडील इतिहास अभ्यासक, संशोधक आणावेत, आम्ही आमच्याकडील बहूजन समाजातील इतिहास अभ्यासक, संशोधक आणू आणि जाहीर चर्चा घडवून आणावी, असं मत मनोज आखरे यांनी व्यक्त केलं.
मनोज आखरे म्हणाले, राज ठाकरे यांनी हिंमत असेल तर आपल्याकडील इतिहास अभ्यासक, संशोधक आणि आमच्याकडील बहूजन समाजातील इतिहास अभ्यासक, संशोधक घेऊन जाहीर चर्चा करावी. सत्य इतिहासाचे दर्शन करावे. तिथं संदर्भ व पुराव्यासह मांडणी होईल. नाही तर उगाच मुक्ताफळे उधळून महाराष्ट्राला वेठीस धरू नये.
सर्वांना माहिती आहे की तुमचा इतिहास हा दंगली घडविण्याचा आहे. आमचा इतिहास हा दंगली शमविण्याचा आहे. कारण तुम्ही आपण दंगलीचे स्त्रोत पसरविणारा इतिहास लेखन करणाऱ्या तोतया बाबासाहेब पुरंदरेंसारख्या शाहिरांच्या विचारांचे वारसदार आहात. आम्ही शिव-शाहु-फुले-आंबेडकर, अण्णाभाऊ, प्रबोधनकार ठाकरे आणि आता पुरुषोत्तम खेडेकर यांच्या विचारांचे वारसदार आहोत, असंही मनोज आखरे म्हणाले.
यावेळी आखरे यांनी राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंवरुनही टोले लगावले. ते म्हणाले, तुम्ही प्रतीगामी व्यवस्थेचे वाहक आहात तर आम्ही पुरोगामी विचारधारा जतन करणारे पाईक आहोत. तुम्ही प्रबोधनकार ठाकरे यांचे फक्त रक्ताचे वारसदार आहात, तर आम्ही प्रबोधनकार ठाकरे यांच्या सत्यशोधक विचारांचे वारसदार आहोत. म्हणून तुम्हाला संभाजी ब्रिगेडचे खुले आव्हान आहे, आम्ही फांद्या छाटण्यापेक्षा मुळावरच घाव घालतो.