नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कॅबिनेट विस्तार केला आहे. यामध्ये मोठे फेरबदल करताना १२ मंत्र्यांना नारळ दिला होता. या मंत्रिमंडळात जागा मिळालेले काही युवा नेते आणि प्रमोशन मिळविणारे मंत्री यांना आता कॅबिनेट समित्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. यामध्ये भूपेंद्र यादव. सर्वानंद सोनोवाल, मनसुख मंडाविया यांच्यासह अन्य मंत्र्यांचा समावेश आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, किरण रिजिजू, अनुराग ठाकूर यांच्यासारख्या युवा चेहऱ्याबरोबरच महाराष्ट्राचे हेवीवेट नेते नारायण राणे यांनादेखील मंत्रिमंडळ समितीमध्ये जागा मिळाली आहे. रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर सारखे मोठे चेहरे कॅबिनेटमधून बाहेर गेले आहेत. यामुळे कॅबिनेट समित्यांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.
संसदीय कामकाज समितीवर अर्जुन मुंडा, विरेंद्र कुमार, किरण रिजिजू, अनुराग ठाकुर यांना घेण्यात आले आहेत.
पॉलिटिकल अफेयर्सशी संबंधित महत्वाच्या समितीवर स्मृती इराणी, सर्वानंद सोनोवाल, गिरिराज सिंह, मनसुख मंडाविया, भूपेंद्र यादव याना घेण्यात आले आहे. या समितीचे अध्यक्ष खुद्द पंतप्रधान आहेत.
इन्व्हेस्टमेंट आणि ग्रोथशी संबंधीत समितीवर नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदे, अश्विनी वैष्णव यांची नियुक्ती झाली आहे.
रोजगार आणि स्किलशी संबंधित समितीवर धर्मेंद्र प्रधान, अश्विनी वैष्णव, भूपेंद्र यादव, हरदीप पुरी, आरसीपी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही समितीदेखील पंतप्रधानांच्या नेतृत्वात आहे.