
कोलकाता/पुणे : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या नावाचाही समावेश आहे. मात्र आता बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. एक पत्रक प्रसिद्ध करून त्यांनी पद्मभूषण पुरस्कार घेणार नसल्याचे जाहीर केले आहे.
या निर्णयाबाबत बुद्धदेव भट्टाचार्य यांनी सांगितले की, मला पद्मभूषण पुरस्काराबाबत काहीही माहिती नाही. मला याबाबत कुणी विचारले नाही. जर कुणी मला हा पुरस्कार दिला असेल तर मी तो पुरस्कार नाकारत आहे. ज्योती बसू यांनी मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्रिपद सांभाळले होते. ते २०११ मध्ये डाव्या पक्षांचा पराभव होईपर्यंत पश्चिम बंगालचे ते मुख्यमंत्री होते.
बुद्धदेव भट्टाचार्य हे सीपीआयएमचे पोलिट ब्युरोचे सदस्य राहिले आहेत. आतापर्यंत सीपीएम आणि सीपीआयच्या कुठल्याही नेत्याने अशा प्रकारचा पुरस्कार स्वीकारलेला नाही. माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनाही भारतरत्न सन्मान देण्याची चर्चा झाली होती. मात्र त्यांनीही त्याला नकार दिला होता.
हा संगीत साधनेचा सन्मान : डॉ प्रभा अत्रे
इतकी वर्षे जी संगीत साधना केली. त्याचा हा सन्मान आहे. आपण जे काम करतो. ते लोकापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्याकडून परत वाहवा मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे, अशी भावना ’स्वरयोगिनी’ डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली.
प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून भारतीय अभिजात संगीत क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या डॉ. प्रभा अत्रे यांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ‘पदमविभूषण’ जाहीर झाल्याने पुणेकरांसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. यापूर्वी ’पदमश्री’ आणि ‘पदमभूषण’ हा सन्मान देखील त्यांना मिळाला आहे. ख्याल गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत अशा संगीत प्रकारांवर त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे . भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्याच्या कार्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. ’स्वरमयी’, ‘सुस्वराली’, ‘‘स्वरांगिणी’, ‘स्वररंजिनी’ या संशोधनपर संगीतविषयक पुस्तकांसह ‘अंत:स्वर’ या काव्यसंग्रहाचे लेखन त्यांनी केले आहे. पुण्यात ‘स्वरमयी गुरुकुल’ संस्थेची स्थापना करून त्यांनी त्याद्वारे पारंपरिक गुरु-शिष्य शैलीतील संगीत शिक्षण व समकालीन संगीत शिक्षणाचा मेळ घातला आहे. या संस्थेमार्फत, प्रभा अत्रे फाउंडेशनद्वारा अनेक नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे.