कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाची चर्चा; पक्षांतर्गत विरोध वाढला
बेंगळुरू: कर्नाटक भाजपमधील अंतर्गत वाद अद्यापही शमलेला दिसत नाही. कर्नाटकमधील भाजप नेत्यांनी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना विरोध केला असून, नेतृत्व बदलाच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. मुख्यमंत्री बदलांच्या चर्चांबाबत बी. एस. येडियुरप्पा यांना विचारले असता, त्यांनी सूचक प्रतिक्रिया दिली असून, पक्षनेतृत्व सांगेल, तेव्हाच राजीनामा देईन, असे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री येडियुरप्पा त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील आणि पुढची निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल, अशी प्रतिक्रिया येडियुरप्पा समर्थकांनी दिल्याचे सांगितले जात आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही. याबाबतची कोणतीच चर्चा नाही. त्यांनी फक्त वक्तव्य केले की, पक्ष जो निर्णय देईल तो मान्य असेल. कारण ते पक्षाचा आदेश मानणारे नेते आहेत, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एम. नारायण यांनी म्हटले आहे.
मला पक्ष नेतृत्वाने राजीनामा देण्यास सांगितलं. तर मी तात्काळ राजीनामा देईन. पण मला वाटतं कर्नाटक भाजपात दुसरा पर्याय नाही. जिथपर्यंत दिल्लीतील नेतृत्वाला माझ्यावर विश्वास आहे. तिथपर्यंत मी मुख्यमंत्रिपदावर राहणार. ज्या दिवशी सांगतील राजीनामा दे, त्या दिवशी राजीनामा देईन आणि राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र काम करेन, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले आहे.