
मुंबई : पेट्रोल, डिझेलचा समावेश वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) करण्यास विरोध करणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादीचा खरा चेहरा उघड झाल्याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केली. इंधनाचा समावेश जीएसटीत करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर आज प्रसार माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या भूमिकेवर टीकास्त्र सोडले.
एकीकडे पेट्रोल डिझेलचे भाव वाढत आहेत हे सांगायचे आणि ते भाव कमी करण्यासाठी पेट्रोल डिझेल हे जीएसटीत आणण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आणला, तर त्याला विरोध करायचा. काँग्रेस-राष्ट्रवादीची ही पूर्णपणे दुटप्पी भूमिका आहे, असे फडणवीस म्हणाले. पेट्रोल-डिझेल हे जीएसटीत आणायला या पक्षांनी विरोध केला तर भाजप आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
संपूर्ण देशात पेट्रोल डिझेलचा एकच दर असावा म्हणून त्यांचा समावेश जीएसटीत करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आणला तर त्यामुळे पेट्रोल-डिझेल २० ते २५ रुपयांनी स्वस्त होऊ शकेल, असा दावा फडणवीस यांनी केला. मात्र, या प्रस्तावाला विरोध करणे ही काँग्रेस-राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका आहे. मग कालपर्यंच सायकल घेऊन का निघाले होता?असा सवाल फडणवीस यांनी केला.