फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ‘बर्थ डे पार्टीत ड्रग्ज’ सेवन; बॉलिवूड अभिनेत्रीला अटक
मुंबई : बर्थ डे पार्टीत ड्रग्ज सेवन करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीला मुंबईत अटक करण्यात आली आहे. सांताक्रुझमधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये संबंधित अभिनेत्री मित्रांसोबत ड्रग्ज पार्टी करताना रंगेहाथ सापडली. बॉलिवूडमध्ये लहान मोठे रोल करणाऱ्या ही अभिनेत्री आहे.
मुंबईतील सांताक्रुझमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरु असल्याची खबर मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धाड घातली. त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री मित्रासोबत वाढदिवसाची पार्टी साजरी करत होती. पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकून या प्रकाराची शहानिशा केली. त्यानंतर अभिनेत्रीला मित्रासोबत अटक करण्यात आली. हॉटेलच्या एका रुममध्ये ती चरस पित असल्याची माहिती आहे.
तिचा साथीदार आशिक हुसैन यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सांताक्रुझ पोलिसांनी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी दोघांना कोर्टात हजर केलं असता जामिनावर मुक्तता करण्यात आली. तिने आतापर्यंत बॉलिवूडसह काही तेलुगू चित्रपटातही काम केलं आहे.