मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आजपासून मुंबईतून सुरू होत आहे. मात्र, या जन आशीर्वाद यात्रेपूर्वीच मुंबईत वादाला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत भाजपने लावलेले पोस्टर्स बीएमसीने काढण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महानगरपालिकेने केलेल्या या कारवाई दरम्यान पोलीस आणि बीएमसी कर्मचाऱ्यांसोबत भाजपच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची सुद्धा झाल्याचं पहायला मिळालं.
नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेसाठी मुंबईत विविध ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून पोस्टर्स, होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. माहीम भागांत लावण्यात आलेले पोस्टर्स बीएमसी कर्मचाऱ्यांनी काढायला सुरूवात केली आहे.
राणे आपल्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यान बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करणार आहेत. त्याला शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांनी विरोध केला आहे. इतकेच नाही तर राणेंना बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळापर्यंत पोहोचू देणार नाही असा इशाराच दिला आहे. शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नारायण राणेंना नाही. शिवसेनाप्रमुखांसोबत बेईमानी करणारा नेता महाराष्ट्रात दुसरा झालेला नाही. अशा माणसाला बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेण्याचे अधिकार नाही आणि शिवसैनिक ते घेऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.
नारायण राणेंनी वरळी दौरा टाळला?
नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचं शेड्युल बदलण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघात नारायण राणे यांनी जाणं टाळलं असल्याची माहिती समोर येत आहे. नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पूर्वीच्या शेड्युलमध्ये वरळी नाका येथे सभा आयोजित केली होती. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाणं टाळलं आहे.