राजकारण

राज्यातील चार महापालिकांमधील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : धुळे, अहमदनगर, नांदेड- वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली आहे. त्यानंतर २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी होईल, अशीदेखील माहिती मदान यांनी दिली. या पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. ही आचारसंहिता निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील, असं आयुक्त मदान यांनी सांगितलं आहे.

पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत स्वीकारले जातील. ५ डिसेंबर २०२१ रोजी शासकीय सुट्टीमुळे नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत. ७ डिसेंबर २०२१ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत ९ डिसेंबर २०२१ पर्यंत असेल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना १० डिसेंबर २०२१ रोजी निवडणूक चिन्हे नेमून देण्यात येतील. २१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी २२ डिसेंबर २०२१ रोजी होईल, अशी माहिती आयुक्त मदान यांनी दिली.

महानगरपालिकानिहाय रिक्तपदे अशी: धुळे- ५ ब, अहमदनगर- ९ क, नांदेड वाघाळा- १२ अ, सांगली मिरज कुपवाड- १६ अ.रा

४ हजार ५५४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचं मतदानही २१ डिसेंबरलाच

राज्यात कोरोना संक्रमणाचा वेग काहीसा मंदावला आहे. पण कोरोना संकटामुळे राज्यातील अनेक मोठ-मोठ्या शहरांच्या महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. अनेक महापालिकांची मुदत संपली आहे. या महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून कधीही जाहीर होऊ शकतो. पण त्याआधी महापालिकेकडून आधी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात राज्यातील ४ हजार ५५४ ग्रामपंचायतींमधील रिक्त झालेल्या ७ हजार १३० ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणुकीची तारीख जाहीर केली होती. या सर्व जागांसाठी २१ डिसेंबरलाच मतदान होणार आहे. तर त्याची मतमोजणीही २२ डिसेंबरला होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button