आरोग्य

मुंबईला मिळाला दीड लाख कोरोना लसींचा साठा, ३ दिवसांचा प्रश्न सुटणार

मुंबई : कोविड प्रतिबंध लसीचा तुटवडा जाणवत असतानाच रविवारी मुंबईसाठी १ लाख ५८ हजार मात्रा मिळाल्या आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या शासकीय आणि खासगी लसीकरण केंद्रांना त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारपासून (२६ ते २८ एप्रिल २०२१) असे किमान ३ दिवस मुंबईतील लसीकरण सुरळीत होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, मुंबईला मिळालेल्या लस साठ्यात कोव्हॅक्सिन लसीचा साठा अतिशय मर्यादीत असल्याने मोजक्याच केंद्रांवर आणि त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्याने ही लस देण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, राज्य सरकारतर्फे ५९ लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३२ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागते. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे.

बृहन्मुंबई महानगर पालिकेला आज कोविशिल्ड लसीच्या १ लाख ५० हजार तर कोव्हॅक्सिन लसीच्या ८ हजार अशा एकूण १ लाख ५८ हजार मात्रा प्राप्त झाल्या आहेत. हा साठा महानगरपालिकेच्या कांजूरमार्ग येथील प्रादेशिक लस साठवण केंद्रात नेण्यात आला आहे. मुंबईतील महानगरपालिका, शासकीय आणि खासगी अशा सर्व लसीकरण केंद्रांना कांजूरमार्ग येथूनच त्यांची सरासरी दैनंदिन आवश्यकता लक्षात घेऊन लस साठा वितरण सुरू करण्यात आले आहे.

लस साठा उपलब्ध झाल्याने पुढील किमान तीन दिवस खासगी केंद्रांना देखील लसीकरण मोहीम राबवता येईल. लस साठा प्राप्त झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत त्याचे वितरण सुरू होते. ज्यांनी लस साठा आज नेला नाही त्यांना उद्या सकाळी ८ पासून लस साठा नेता येईल. त्यामुळे २६ एप्रिलला काही केंद्रांवर लसीकरण प्रत्यक्ष उशिराने सुरू होण्याची शक्यता आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला व आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन बीएमसीने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button