ठाणे: आर्यन खानला ड्रग्जप्रकरणात क्लीनचिट मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करणे हा भाजपचा धंदा आहे. भाजप ही ब्लॅकमेलिंग करणारी पार्टी आहे. आर्यन खान प्रकरणात आपण ते पाहिलच आहे. त्याला ड्रग्ज प्रकरणात त्रास दिला गेला. या प्रकरणात आर्यनचा काहीच संबंध नसल्याचं एसआयटीनेही म्हटलं आहे. त्यामुळे भाजप केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून सत्तेचा कसा दुरुपयोग करतंय हे आर्यन प्रकरणावरून स्पष्ट होत आहे, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे. नाना पटोले आज ठाण्यात होते. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना आर्यनप्रकरणापासून ते ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला धारेवर धरलं. तसेच भाजपवर घणाघाती हल्लेही चढवले.
नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही भाजपला धारेवर धरले. ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होण्याची मागणी होत आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात ओबीसींचा डेटा जमा करण्यात आला होता. हे डेटा देण्यास केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात मनाई केली आहे. त्यामुळे ओबीसींच्या सामाजिक आणि राजकीय आरक्षणावर गदा आली आहे. परिणामी ओबीसींचा उद्रेक झाला असून ओबीसींना आता काँग्रेसचं न्याय देऊ शकते, असं पटोले यांनी म्हटलं आहे.
युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. त्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारला काही सवाल केले. आपल्या देशातील मुलांना वाचवण्यात आलं पाहिजे. कित्येक मुलं त्यांचे व्हिडीओ व्हायरल करत आहेत. त्यामुळे अंगावर काटा उभा राहत आहे. कोणतंही मिशन सुरू करा. पण आमची सर्व मुलं सुखरूप मायदेशी आणा एवढीच आमची मागणी आहे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवरही टीका केली. केंद्र सरकारकडून काहीही अपेक्ष नाही. एअर इंडिया विकली, रेल्वे विकली, गॅस दरवाढ केली, आता पाच राज्यांत निवडणुका सुरू आहेत. नंतर बघा पुढे काय होते. पुढे नोकऱ्या आल्या तर त्यामध्ये आरक्षण राहणार नाही. भाजपने सर्व सार्वजनिक उपक्रम विकले. या देशात अराजकता माजवण्याचं काम सुरू आहे. तर काँग्रेस संविधान वाचवण्याचं काम करत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.