प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची भाजपची प्रवृत्ती; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका
कराड : युक्रेनमध्ये अडकलेल्या दहा हजार विद्यार्थ्यांना देशात परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून फारसे प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकांची भाषणे व उद्घाटने करत फिरत आहेत. ते युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांबाबत फार गंभीर आहेत, असे वाटत नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. सातारा जिल्ह्यातील कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची भाजपची प्रवृत्ती आहे. यापूर्वी अनेकवेळा युद्ध परिस्थितीमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना काँग्रेस सरकारने सुखरूप परत आणले होते. त्यावेळी कोणतीही भाषणबाजी किंवा घोषणाबाजी झाली नव्हती. ती आता पाहायला मिळत आहे.
विधिमंडळ अधिवेशनावेळी राष्ट्रगीत सुरू असताना राज्यपाल तेथून निघून गेले. इतिहासात यापूर्वी कधीही असे घडलेले नाही. राज्यपालांनी असे वागून राष्ट्रगीताचा, घटनेचा तसेच राज्यातील तमाम जनतेचा अपमान केला असल्याची टीकादेखील त्यांनी यावेळी केली.
मुंबई-बंगळुरू कॉरिडॉर महत्त्वाचा
कराडच्या विमानतळावरून दररोज विमानसेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. बांधकाम परवान्यांबाबतची अनिश्चितता संपली असून, कराड व परिसरात औद्योगिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी कराड-चिपळूण रेल्वे व रस्ते वाहतूक व्हावी तसेच मुंबई ते बंगळुरू औद्योगिक कॉरिडॉर मंजूर व्हावा, यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे चव्हाण म्हणाले.