दोन दिवसीय अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याची भाजपची रणनीती
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर बैठक पार पडली. यावेळी दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला कोण-कोणत्या विषयांवर कोंडित पकडायचं, या मुद्द्यावर प्रामुख्याने चर्चा झाल्याचं कळतंय. शेतकरी, कोरोना ते आरक्षण अशा सर्व विषयांना न्याय देण्याबाबत आम्ही रणनीती ठरवल्याचं या बैठकीनंतर आमदार आशिष शेलार यांनी सांगितलं.
राज्यासमोर अनेक महत्वाचे प्रश्न आहे. संपूर्ण अधिवेशन झालं असतं तर सर्व विषयांना न्याय देता आला असता. पण सरकारनं यापेक्षा अजून छोटं अधिवेशन ठेवता येत नाही की काय म्हणून दोन दिवसांचं अधिवेशन ठेवलं आहे, असा टोला शेलार यांनी लगावलाय. त्याचबरोबर अधिवेशनाच्या दोन दिवसांत शेतकरी, कोरोना ते आरक्षण या मुद्द्यांवर सरकारला प्रश्न विचारण्याचं काम आम्ही करु, असं शेलार म्हणाले. त्यामुळे दोन दिवसाच्या अधिवेशनातही सरकारला कोंडित पकडण्याची रणनीती भाजपनं आखल्याचं दिसून येत आहे.