Top Newsराजकारण

भाजपच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून संजय राऊतांवर पलटवार

मुंबई : राज्यातलं सरकार पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. आधी आमच्या नेत्यांना लक्ष्य केलं, नंतर माझ्याकडे वळले. पण यंत्रणांना भीक घातली नाही म्हणून ईडीच्या धाडी सुरू झाल्या. काय बघायचं ते बघून घ्या, आम्हीदेखील बघून घेऊ, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांना लक्ष्य केलं. यावेळी, भाजप नेत्याच्या मुलीच्या लग्नात कारपेट तब्बल साडे नऊ कोटींचं वापरल्याचां गंभीर आरोपही त्यांनी केला. राऊत यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनंतर भाजपचे दुसऱ्या फळीतील नेते सरसावले असून ते राऊतांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करत आहेत.

किरीट सोमय्यांचा दलाल असा उल्लेख करत राऊत यांनी सोमय्यांच्या आरोपांवरही खुलासा केला. संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नातील खर्चावरुन होत असलेल्या आरोपावर राऊत यांनी पलटवार केला. त्यावर, भाजप नेते माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा उल्लेख झाल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी राऊतांच्या आरोपावर खुलासा केला आहे. ‘स्वत:च्या खर्चावर बोट ठेवलं जातं, तेव्हा मनुष्य अशाप्रकारे वागतो. मुलीच्या लग्नाची ही २ वर्षांपूर्वीची गोष्ट असून त्यांच्या विभागाने चौकशी करुन अहवाल दिला आहे. त्या अहवालात काहीही सिद्ध झालं नाही, असे मुनगंटीवार यांनी म्हटलं. तसेच, सध्याचे मुख्यमंत्रीही त्या सोहळ्याला उपस्थित होते, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला.

माझ्या मुलीच्या लग्नात असलेल्या मेहंदीवाल्याकडे ईडीवाले गेले, नेलपॉलिशवाल्याकडे गेले. मी कुठं कपडे शिवले हे विचारत माझ्या मुलुंडमधील टेलरकडेही ईडीवाले गेले होते. कितना पैसा दिया, क्या क्या दिया… अशी विचारणा केली. तुम्ही आमच्या घरात शिरताय, तुम्ही आमच्या मुलांपर्यंत जाताय, दुकानात येताय, असे म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यावेळी, एका माजी मंत्र्यांच्या मुलीच्या लग्नाचं उदाहरणही त्यांनी दिलं.

भाजपच्या माजी मंत्र्याच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईत मोठा सेट उभारला होता. हे मंत्रीमहोदय हे वनमंत्री होते, म्हणून तो सेट फॉरेस्ट टाईपचा उभारला होता. येथे जंगलाचा फिल यावा म्हणून या सेटमध्ये अंथरलेलं कारपेट हे ९.५ कोटी रुपयाचं होतं, अशी माहिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. ईडीला हे दिसलं नाही का? असा सवालही राऊत यांनी विचारलं. संजय राऊत यांचा रोख थेट भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे होता.

म्हणून शिवसेनेनं राऊतांपासून सुरक्षित अंतर राखलं असावं, चंद्रकांत पाटील यांची टीका

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. शिवसेना भवनात राऊतांचा हा एकपात्री प्रयोग झाला, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. आरोप झाले, तर निर्दोषत्व सिद्ध करण्याचे अनेक घटनादत्त अधिकार आणि मार्ग आहेत. ते राहिले बाजूला, आरोप करणाऱ्याचं अतिशय असभ्य भाषेत चारित्र्यहनन करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न होता. राऊत यांची भाषा राजकीय सभ्यतेत बसणारी नव्हती. याचसाठी शिवसेनेनं राऊतांपासून सुरक्षित अंतर राखलं असावं, असे यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

मागील दोन तीन दिवस मोठी गोष्ट बाहेर काढणार असल्याचा कांगावा संजय राऊत यांनी केला. जगात आजपर्यंत कोणाची पत्रकार परिषद झालीच नाही, यांचीच पहिल्यांदा होत आहे, असे हे वागत होते. या सर्वातून शेवटी ‘खोदा पहाड निकला चुहा’ असं सिद्ध झालं. इतरांविषयी बोलताना अपशब्दांचा वापर करणं ही यांची संस्कृतीच आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली, असं म्हणणंच धाडसाचं ठरेल. कारण पत्रकार परिषदेत प्रश्नोत्तरांची देवाणघेवाण होते, ते इथे नव्हतंच. त्यामुळे हा एकपात्री प्रयोग बघणाऱ्यांची चांगलीच करमणूक झाली असेल, असं म्हणतो. राजकारणात गती असलेल्यांच्या तर पोटात हसून हसून मुरडा आला असावा, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून ज्यांची चौकशी झाली, त्यांचं अरण्यरूदन असा हा प्रकार होता. प्रयोग आणखी ‘नबाबी’ होण्यासाठी तुम्ही मित्रांची मदत घ्यायला हवी होती. कदाचित, नाशिकसारख्या दूरच्या ठिकाणांहून माणसं जमवता-जमवता ही जमवा-जमव जमली नसावी. असो. संजय राऊत गेट वेल सून!, असा खोचक टोल चंद्रकांत पाटील यांनी लगावला. शिवसेना भवनात राऊतांचा हा एकपात्री प्रयोग झाला, यापलीकडे यात शिवसेना कुठेच नव्हती. त्यामुळे राऊत मध्ये-मध्ये बाळासाहेब, शिवसेनेचं नाव ओढून-ताणून घेत होते. उद्धवजी तर दूरच, पण ज्या आदित्य ठाकरेंना पर्यावरणाचा हवाला देत प्रकल्पावर कारवाई करायला राऊतांनी सांगितलं, तेही तिथे नसावे?, असेही पाटील म्हणाले.

किरीट सोमय्या यांनीही केला पलटवार

संजय राऊत म्हणाले की, भाजपाचे किरीट सोमय्या ईडीचे दलाल आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसेच मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो की कुणाच्या घरावर धाडी पडणार, अशी टीकाही संजय राऊतांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे किरीट सोमय्या ईडीच्या कार्यालयात बसून दही-खिचडी खात असतो, असा दावा देखील संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला. राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर किरीट सोमय्या यांनीही ट्विटरद्वारे पुन्हा निशाणा साधला आहे. २०१७ मध्ये संजय राऊत यांनी सामना वर्तमानपत्राच्या माध्यमातून अशाच प्रकारे माझी पत्नी प्राध्यापिका डॉ. मेधा सोमय्या यांच्यावर इमारत बांधकाम कंपनीच्या संदर्भात आरोप करून मानहानी करण्याचा प्रयत्न केला होता, असं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

सोमय्या पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत कोविड सेंटर घोटाळ्यावर का प्रतिक्रिया देत नाहीत? प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर यांच्याशी असलेल्या संबंधांवर का बोलत नाहीत? भ्रष्टाचाराविरोधातील आमचा लढा सुरूच राहणार आहे, असं किरीट सोमय्यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. आत्तापर्यंत ठाकरे सरकारमधील नेत्यांनी माझ्याविरोधात १० गुन्हे दाखल केले आहेत. अजून तीन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असा दावाही किरीट सोमय्यांनी केला आहे.

हा पिक्चर ट्रेलरमध्येच फ्लॉप; प्रवीण दरेकरांचा टोला

केंद्र सरकारकडून महाविकास आघाडीचे सरकार पडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचंही राऊत म्हणाले. यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माध्यमांशी संवाद साधत या पिक्चरचा ट्रेलरच फ्लॉप झाल्याचं म्हणत राऊतांना टोला लगावला. जिकडे करायला पाहिजे तिकडे काही करायचं नाही. यांना फक्त इव्हेंट करायचंय, भावनिक वातावरण तयार करायचं, लोकांना डायव्हर्ट कसं करायचं यापुढे त्यांच्या आरोपात काडिमात्र तथ्य नाही, असं दरेकर यावेळी म्हणाले. यावेळी राऊत यांनी भाजपच्या मोहित कंबोज यांच्यावर केलेल्या आरोपवरही विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं.

आरोप हा केवळ आरोपापुरता आहे. संजय राऊत यांच्यामुळेच हे सरकार बसलंय. सरकार बसवण्यात सर्वात मोठी भूमिका त्यांचीच आहे. शरद पवार यांना वळवणं, पक्षाला त्यांच्या दावणीला बांधणं संजय राऊत यांनी केलंय. त्यांनी मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना सांगितलं तर लगेच अंमलबाजवणी होते. मोहित कंबोज यांच्याविरोधात आरोप करण्याऐवजी तक्रार करा, कारवाई करा. पण यांना त्यात जायचं नाहीये केवळ ढोल पिटायचे आहेत, असंही ते म्हणाले.

संजय राऊतांचा स्मगलरशी संबंध काय?, मोहित कंबोज यांचे राऊतांना चार सवाल

संजय राऊत यांनी मोहित कंबोज यांच्यावर घणाघाती आरोप केल्यानंतर मोहित कंबोज यांनी त्याला पलटवार केला आहे. संजय राऊत यांचे स्मगरलशी संबंध काय? असा सवाल करत कंबोज यांनी राऊत यांना चार सवाल केले आहेत. राऊतांनी इकडचे तिकडचे आरोप करण्यापेक्षा जम्बो कोविड घोटाळ्यातील प्रश्नावर उत्तरे द्यावीत. तसेच प्रवीण यांनी ईडीला जी माहिती दिली आहे, त्यावर राऊतांनी भाष्य करावं, असं आव्हानच कंबोज यांनी केलं आहे. तसेच मै झुकुंगा नही, असं सांगत आपली बदनामी केल्याप्रकरणी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन बॉम्ब टाकल्यानंतर मोहित कंबोज यांनीही तत्काळ पत्रकार परिषद घेऊन पलटवार केला आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्या संजय राऊतांना मानहानी केल्याबद्दल कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे देखील कंबोज म्हणाले.

मोहित कंबोज यांनी यावेळी संजय राऊत आणि त्यांचा एकत्रित फोटो दाखवला. राऊत दरवर्षी माझ्या घरी गणपतीला येत असतात. त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. एवढेच नाही तर त्यांना जेव्हाही आर्थिक मदतीची गरज पडली. तेव्हा मी त्यांना मैत्रीत मदतही केली आहे. पण आता त्यांना स्मृतीभ्रंशाचा त्रास झाला आहे. त्यामुळे ते विसरत आहे, असा हल्ला मोहित कंबोज यांनी चढवला.

राऊत यांनी कंबोज यांना फडणवीसांचा ब्लू आईज बॉय म्हटलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. मला त्यांनी फडणवीसांचा ब्ल्यू आईज बॉय म्हटलं त्याचा मला अभिमानच आहे. फडणवीसांचा प्यून जरी म्हटलं असंत तरी ते माझं सौभाग्य असतं. माझी लॉयलटी पार्टीशी आहे. फडणवीसांशी आहे. पण तुम्ही कुणाचे ब्लूआईज बॉय आहात? ठाकरेंची की पवारांचे? तुम्ही कुणाला लॉयल आहात?, असा खोचक सवालच त्यांनी केला. तुमचे प्रवीण राऊतांशी संबंध उघड झाले, भ्रष्टाचार उघड झाला. म्हणून तुम्ही फ्लॉपशो केला. आम्हाला घामटा फुटेल असं तुम्ही म्हणाला. पण तुम्हालाच घामटा फुटला आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

शासन प्रशासन तुमच्याकडे आहे. राकेश वधावनकडून १२ हजार कोटीची जमीन मी १०० कोटीला खरेदी केली. म्हणजे एवढी स्वस्त जमीन जगात तरी कुठे मिळते. दहा लाख स्क्वेअर फुटाची जमीन जगात कुठे असते का? राऊतांनी उत्तर द्यावं.

म्हाडाची जमीन गुरु आशिषकडून आमच्या कंपनीने खरेदी केली. त्यात माझे पैसे बुडाले. त्याविरोधात मी गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळच्या काँग्रेस सरकारच्या मुख्यमंत्र्याने राकेश वाधवन आणि संबंधितांना रिडेव्हल्पमेंटसाठी जमीन दिली होती. फडणवीसांनीच या वाधवानवर गुन्हा दाखल केला आहे. त्याचे आम्ही तक्रारदार आहोत.

प्रवीण राऊत यांची डीडीपीएल ग्लोबल इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड नायगाव, वसई, विरारमध्ये आहे. प्रवीण राऊतांच्या फ्रंटमॅनने एका माणसाची खोटी पॉवर अॅटर्नी करून मुंबईतील एका बिल्डरला येथील जमीन विकली. त्याची चौकशी झाली. आता हीच माहिती मी ईओडब्ल्यूला देईल. या सेटलमेंटच्या बैठकीला संजय राऊत होते. पाच हजार कोटीचा प्रोजेक्ट. १५०० कोटीला जमीन विकली. साडेसातशे कोटी प्रवीण राऊतला मिळाले. संजय राऊतांना किती कट मिळाले?

तुमचा आणि ग्रँड हयातचा संबंध काय? राजकुमार गुप्ता आणि त्यांची पत्नी वंदना गुप्ता यांच्यावर डीआरआयचा एफआयआर आहे. गुप्तावर स्मगलिंग रॅकेट चालवण्याचा आरोप आहे. त्यांच्याशी संजय राऊतांचा काय संबंध आहे? त्यांची दलाली करण्यासाठी त्यांचा काय कट आहे?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button