राजकारण

मुख्यमंत्र्यांच्या भाषणात प्रचंड विरोधाभास; भाजपची टीका

मुंबई: शिवसेनेच्या ५५ व्या वर्धानपनदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी फेसबुकद्वारे राज्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला. यानंतर उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून पुन्हा एकदा टीका करण्यात आली आहे. एकाच भाषणात किती विरोधाभास, नेमकं काय म्हणायच ते नक्की आहे का, अशी विचारणा भाजपकडून करण्यात आली आहे.

विरोधक सातत्याने माझ्यावर घराबाहेर पडत नाही, घरातून कारभार करत आहेत म्हणून टीका करतायत. त्यांना मला सांगायचे आहे की, घरातून काम करतोय तर एवढे काम होत आहे, मग बाहेर पडलो तर विचार करा किती काम होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विटरवरून निशाणा साधला आहे.

कोणते काम उद्धव ठाकरेजी? महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनासंख्या, मराठा आरक्षण कोर्टात न मांडल्याने गमावले, शेतकऱ्यांना मदत नाही, महाराष्ट्र थांबला नाही या जाहिरातीने तुमच समाधान होत असेल महाराष्ट्राचा विकास ठप्प झाल्याची यादी मोठी आहे, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी स्वबळावरून टोलेबाजी केली. मात्र, एकाच भाषणात दोन वेगवेगळ्या केलेल्या वक्तव्यावरूनही केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला असून, एकाच भाषणात किती विरोधाभास? नेमक काय म्हणायच ते तरी नक्की आहे का? असे केशव उपाध्ये यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये विचारले आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलेल्या संबोधनावेळी ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले. ममता लढल्या व जिंकल्या याला म्हणतात स्वबळ, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यावरून केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला असून, बरोबर त्यांच कौतुक आहेच कारण त्यांनी समोरासमोर लढाई केली. सत्तेसाठी ज्यांच्यासोबत निवडणुका लढल्या त्यांचा विश्वासघात करीत आयत्यावेळी युती मोडत विरोधकांसोबत नाही जाऊन बसल्या, अशी बोचरी टीका उपाध्ये यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button