…तरच शिवसेनेबाबत विचार करू; राऊत-शेलारांच्या भेटीनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
मुंबई : भाजप नेते आशिष शेलार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात गुप्त बैठक झाल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या दोन्ही दिग्गज नेत्यांच्या भेटीवर भाष्य करताना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ‘भाजप शिवसेनेसोबत जाण्यासाठी स्वतः प्रयत्न करणार नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊन चूक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल, असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या भेटी होत असतात. ही परंपरा आहे. पण भाजप सत्तेसाठी आता शिवसेनेसोबत जाण्यासाठी प्रयत्न करणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन चुक झाली असं शिवसेनेला वाटलं तर ते येतील. तेव्हा भाजप विचार करेल, असं मुनगंटीवार म्हणाले.
दोन नेते एकमेकांना भेटू शकतात : दरेकर
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर राऊत आणि शेलार भेटीचं गूढ जास्तच वाढलं. गेल्या काही दिवसांपासून काही भेटीगाठी सुरू आहेत. पण या भेटीत एक नेतृत्व कायम आहे. ते म्हणजे संजय राऊत. पण राऊत आणि शेलार यांनी भेटीचं खंडन केलं आहे. भेट झाली नसेल तर त्यावर तर्कवितर्क करणं चुकीचं आहे, असं दरेकर म्हणाले. तसेच पुढे बोलताना तुमच्याकडे फुटेज असले तरी दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, असं प्रवीण दरेकर यांनी सांगितलं. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर राऊत-शेलार भेटीच्या चर्चेत हवा फुंकल्यासारखं झालं आहे.
दरम्यान, आज संजय राऊत यांच्यात मुंबईतील नरीमन पॉईंट परिसरात अर्धा तास बैठक झाल्याची माहिती आहे. ही बैठक नेमकी कशामुळे झाली ? चर्चेचा विषय काय होता ? या सर्व गोष्टी सध्यातरी गुलदस्त्यातच आहेत. या दोन्ही नेत्यांच्या बैठकीतील तपशील समजू शकला नसला तरी त्यांच्या गाड्या मेकर्स चेंबर्समधून बाहेर पडताना कॅमेऱ्यानं टिपल्यामुळे काहीतरी शिजत असल्याचा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.