Top Newsराजकारण

राजकारणाच्या गुन्हेगारीबाबत राज्यात २० हजार सभा; चंद्रकांत पाटलांकडून भाजपचा ‘मेगा प्लॅन’ जाहीर

मुंबई : राज्यातील महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी भाजपकडून राज्यभर २० हजार छोट्या सभांचे आयोजन करण्यात येणार आहे. अमरावती, नांदेड आणि मालेगावच्या दंगलीची मास्टरमाईंड असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत आली, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबाबत एक ठराव मांडण्यात आला. राज्यातील विविध घटकांवर महाविकास आघाडीने कसा अन्याय केला आहे, हे स्पष्ट करणारा राजकीय ठराव मांडण्यात आला. बलात्कार, अंमली पदार्थ, भ्रष्टाचार, व्यवस्था उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न याबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी पक्षातर्फे राज्यभर सभा घेण्यात येतील. तसेच डिसेंबर महिन्यात मुंबईत मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करतील, असं पाटील यांनी सांगितलं.

त्याचबरोबर एसटी कामगारांच्या संपाला कार्यकारिणी बैठकीत पाठिंबा देण्यात आला. भाजप नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्व करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व अन्य सुविधा देणे शक्य आहे व त्यासाठी राज्य सरकारने आर्थिक बोजा सहन केला पाहिजे, असंही पाटील म्हणाले.

त्रिपुरा येथे मशिद पाडण्याची घटना घडली नाही. तरीही अफवेच्या आधारे मालेगाव, नांदेड, अमरावती येथे योजना करून दंगल घडविण्यात आली. चारशे जणांच्या मोर्चाला परवानगी असताना पंधरा ते चाळीस हजार लोक रस्त्यावर आले. या दंगलीत रझा अकादमीची स्पष्ट भूमिका आहे. पण असा अन्याय हिंदू समाज सहन करणार नाही. सरकारने हे हल्ले थांबविले नाहीत तर लोकांना संघटित होऊन रस्त्यावर उतरावे लागेल आणि लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया सरकार रोखू शकत नाही, असा इशाराही पाटील यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

पाटील म्हणाले की, प्रदेश कार्यकारिणी बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. विशेषतः कोरोनाच्या विरोधातील लढाईत मोदीजींनी ज्या प्रकारे नेतृत्व केले आणि त्यांनी पुढाकार घेतल्यामुळे देशात दोन व्हॅक्सिन तयार होऊन शंभर कोटीपेक्षा जास्त डोस दिले गेले व त्यामुळे समाज कोरोनाच्या भितीतून बाहेर पडला याची नोंद करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button