राजकारण

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची ७ नोव्हेंबरला बैठक

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणीची दिल्लीत बैठक आयोजीत करण्यात आलेली आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीतीसाठी भाजपची रणनीतीवर चर्चा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बैठक ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० पासून सुरू होणार असून दुपारी ४.३० पर्यंत चालणार आहे. भाजपची ही एक दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या भाषणाने सुरू होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने संपेल.

या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे सुमारे ३०० नेते उपस्थित राहणार आहेत. सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष, संघटना मंत्री आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एकत्रितपणे पक्षाच्या प्रदेश कार्यालयाशी संपर्क साधणार आहेत. एकूणच संमेलनाचे स्वरूप ऑनलाइन आणि ऑफलाइन असे असणार आहे.

निवडणुकीच्या तयारीवर चर्चा हा या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे. या बैठकीत पक्षाध्यक्षांचे भाषण होणार असून, त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा होणार आहे. यासोबतच एक प्रस्तावही आणला जाईल ज्यामध्ये सर्व राजकीय मुद्दे, आर्थिक आणि परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यांचा समावेश असेल.

भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे हायकमांड या राज्यांमध्ये सातत्याने सभा घेत आहे. सरकारची कामे जनतेपर्यंत नेण्यासाठी भाजप सातत्याने कार्यकर्ता परिषदा घेत आहे. अशा स्थितीत ७ नोव्हेंबरला होणारी ही बैठक निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button