नवी दिल्ली: भाजप आणि शिवसेना यांचे वैर सर्वश्रृत आहे. पण, कधी-कधी या दोन्ही पक्षांचे नेते अशी काही वक्तव्ये करतात, ज्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो. अशाच प्रकारचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘भाजपचा नेहमीच विरोध करावा, असं नाही. त्यांच्या काही चांगल्या गोष्टी आम्ही घ्याव्यात, आमच्या चांगल्या गोष्टी त्यांनी घ्याव्यात’, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे.
नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उत्तर प्रदेश आणि गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. संजय राऊत यांना पत्रकारांनी भाजपच्या जाहिरनाम्याविषयी प्रश्न विचारला. त्यावर राऊत म्हणाले की, ‘आमचे भाजपसोबत नळावरचं भांडण नाही. भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक चांगल्या गोष्टी आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रत्येक गोष्टीला विरोध आम्ही करणार नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणतात, ‘आम्ही त्यांच्या काही चांगल्या गोष्टी घेतो, त्यांनी आमच्या काही चांगल्या गोष्टी घ्यावात. राज्यासाठी, राष्ट्रासाठी त्यांनी काही चांगली पावले उचलण्याचे मान्य केले असेल, तर नक्कीच त्यातल्या काही गोष्टी आम्हीसुद्धा घेऊ,’ असे वक्तव्य केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
मोदींकडून महाराष्ट्राचा अपमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलेल्या भाषणामुळे उठणारी राजकीय आरोपांची राळ निवडणुकीच्या तोंडावर वाढलीय. मात्र, दुसरीकडे भाजपवर आपल्या शेलक्या शब्दांत प्रहार करणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता मात्र, एकट्यानेच बोलायचा ठेका घेतलाय का, म्हणत भाजपने पुढे येऊन बोलावे असे आवाहन केले आहे. राऊत म्हणाले की, पंतप्रधानांचं भाषण मी ऐकलं, वाचलं. भाषण मोदी यांच होतं, पण त्यांनी महाराष्ट्राबाबत वक्तव्य केलं म्हणून महाराष्ट्र सरकारकडून त्याचा खुलासा व्हावा. मला हे ऐकून वाईट वाटलं. महामारीचा उगम चीनमधून झालाय. त्याचं महाराष्ट्र खापर फोडणं योग्य नाही. जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नची वाहवा केली. महाराष्ट्रामुळे महामारी आली म्हणजे हा सरकार, डॉक्टर, नर्स यांचा अपमान आहे. आता भाजपच्या प्रमुख नेत्यांनी याबाबत पुढं येऊन बोलायला हवं. आम्ही एकट्यानेच बोलायचा ठेका घेतलाय का, असा टोलाही त्यांनी लगावला.
सोमय्यांनी कोर्टात जावं
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यासाठी शिवसेना जबाबदार आहे, असे आरोप केले जात आहेत. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असेल त्यांनी न्यायालयात जावं. कायदा आहे. कायद्यानुसार कारवाई होत असते. किरीट सोमय्यांच्या आरोपांचं पोलीस पाहतील. किरीट सोमय्यांनी राज्यपालांकडे जावं. त्यांनी जो बायडन यांना भेटावं, आंतरराष्ट्रीय न्यायालयात जावं. कायद्याचं राज्य आहे, कोणावरही खुनी हल्ला झाला असेल तर कायदा काम करतो. न्यायालयांचे मालक आम्ही नाही, न्यायालयांचे मालक कोण आहे ते सर्वांना माहिती आहे, असं देखील संजय राऊत म्हणाले. शिवाय नारायण राणे, चंद्रकांत दादा बोलले, त्याची दखल दिल्लीत घ्यायची गरज नाही. गोव्यात जाहीरनामा प्रसिद्ध होतोय, गडकरी ते करू शकतात, असं वक्तव्यही त्यांनी केलं.
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांच्यावरील हल्ल्याचा शिवसेनेने निषेध केला आहे. अशा गोष्टींवर कायद्यानुसार कारवाई होते. उगाच आरोपांची आणि अफवांची राळ उठवून चालत नाही. कुणावरही हल्ला झाला असेल तर कायदा काम करत असतो. कुणीही सुटत नाही. न्यायालयांचे मालक आम्ही नाहीत. कोण आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे.
सोनू सूद त्यावेळी कोणाचे होते?
संजय राऊत म्हणाले की, सोनू सूद त्यावेळी कोणाचे होते? राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते? कौतुक कुणी केलं, असा सवालही त्यांनी केला.
खा. संभाजी छत्रपती-राऊत भेटीने राजकीय चर्चांना उधाण
खा. संभाजी छत्रपती यांनी आज संजय राऊत यांची आज अचानक त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये १५ मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर संभाजीराजे यांनी मीडियाशी संवाद साधला. संजय राऊत माझे जुने दोस्त आहे. आज चहा पिण्याची इच्छा झाली. त्यामुळे त्यांच्या घरी आलो. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, असं खा. संभाजी छत्रपती यांनी सांगितलं. यावेळी संजय राऊत यांनी कोणतीही प्रतिक्रिया न देता मौन राहणेच पसंत केलं. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या १५ मिनिटांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची चर्चा रंगली आहे. संभाजीराजे अचानक राऊतांना भेटण्यामागचे कारण काय? यामागे काही राजकारण आहे का? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे. तर, संभाजी छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आल्यानेही त्यानुषंगाने या भेटीकडे पाहिले जात आहे.
खासदार संभाजी छत्रपती आज अचानक संजय राऊत यांच्या निवासस्थानी आले. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. राऊत माझे जुने दोस्त आहेत. दरवर्षी ते मला आणि शरद पवारांना जेवायला सुद्धा बोलावतात. आज त्यांच्यासोबत चहा पिण्याची इच्छा झाली म्हणून त्यांच्या घरी आलो. बाकी काही विषय नाही. एक खासदार दुसऱ्या खासदारा भेटू शकतो हेच दिल्लीचं वैशिष्ट्ये आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले.
मराठा आरक्षणावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अनेक गोष्टी अडचणीत आहेत. पाच मूलभूत प्रश्न राज्य सरकार सोडवू शकतात ते सोडवू शकले नाहीत. त्या संदर्भात मराठा संघटना लवकर निर्णय घेतील. ते जे निर्णय घेतात त्यानुसार मी चालतो, असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, मी मुख्यमंत्र्यांना नेहमीच भेटतो. त्यांना हा विषय माहीत आहे. त्यांना विषय कळवलेला आहे, असं त्यांनी सांगितलं.