Top Newsराजकारण

भाजप-शिवसेना नेत्यांची राजधानी दिल्लीत गळाभेट

शिवसेनेतच जुंपली; चंद्रकांत खैरेंनी सत्तारांना फटकारलं

नवी दिल्ली: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि महाराष्ट्राचे मंत्री अब्दुल सत्तार यांचे संबंध जगजाहीर आहेत, असं विधान खुद्द शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीच केलं. होतं त्यानंतर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचा दिल्लीतील गळाभेटीचा फोटो समोर आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

सध्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील रेल्वेच्या प्रलंबित मागण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. मात्र, भाजप-शिवसेना युतीचा पूल केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच बांधू शकतात, असं वक्तव्य शिवसेना नेते आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी करून काही तास उलटत नाही तो, आता सत्तारांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची गळाभेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

अब्दुल सत्तार यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी जात दानवेंची गळाभेट घेतली. तसं सत्तार आणि दानवे यांची दोस्ती जुनीच आहे. पण काल शिवसेना-भाजप युतीबाबत सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी झालेली ही भेट राज्यात राजकीय भूकंप तर आणणार नाही ना?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

या भेटीनंतर सत्तार यांनी मीडियाशी संवाद साधला. माझ्या मतदारसंघातील रेल्वे संदर्भात मी त्यांना भेटण्यासाठी आलो. जळगाव-सोलापूर रेल्वे सुरू व्हावी म्हणून मी भेटण्यासाठी आलो होतो. मतदारसंघाचे खासदार झाले तर आनंद होईल. मी गंभीर नाही असं दानवे बोलतात. आता मी त्यांना रडत रडत सांगेन, असं मिष्किल विधानही त्यांनी केलं.

यावेळी त्यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या टीकेलाही उत्तर दिलं. सर्व विषयावर बोलण्याचा अधिकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. माझं कालचं वक्तव्य वैयक्तिक आहे. पक्ष किंवा सरकार म्हणून नाही. माध्यमानी विचारलं म्हणून मी उत्तर दिलं, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे हे राज्यातील कर्तव्यदक्ष राजकारणी आहेत. महाराष्ट्राचे नेतृत्व ते उत्तम प्रकारे करत आहेत. तर नितीन गडकरी हे महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे नेते आहेत. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचा पूल जोडायचं त्यांनी मनावर घेतलं तर ते उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील, त्यांना विनंती करतील. कारण शेवटी भाजप-सेना युतीचा निर्णय उद्धव साहेबच घेऊ शकतात, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते.

शिवसेनेतच जुंपली; चंद्रकांत खैरेंनी सत्तारांना फटकारलं

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरीच युतीचा पूल बांधू शकतात असं विधान राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी केलं. त्यामुळे युतीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं असतानाच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मात्र अब्दुल सत्तार यांना फटकारलं आहे. युतीचा निर्णय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील. सत्तार यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी सत्तार यांना फटकारलं आहे. त्यामुळे युतीच्या मुद्द्यावरून शिवसेनेतच जुंपल्याचं चिन्हं दिसत आहे.

शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना घरचा आहेर दिला आहे. अब्दुल सत्तार यांनी युतीबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. युतीबद्दल केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊतच बोलू शकतात. तसेच युतीबाबतचा निर्णय फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आहे. तेच निर्णय घेतील. युती होणार की नाही याबाबत हे दोनच नेते सांगू शकतील. सत्तार ओघाओघाने बोलले असतील. पण त्यांना त्यावर बोलण्याचा अधिकार नाही. मंत्री असताना अशा पद्धतीने विधान करणं चुकीचं आहे, असं खैरे म्हणाले.

दानवे- सत्तार संबंध जगजाहीर

राज्यातील महाविकास आघाडी सरकार यशस्वीपणे काम करत आहे. आमचं सरकार पाच वर्ष काम पूर्ण करेल, असं सांगतानाच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचे संबंध जगजाहीर आहेत, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

कराडांना दिल्ली कळलीच नाही

यावेळी त्यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना टोला लगावला. भागवत कराड यांना आणखी दिल्ली कळलेलीच नाही. दिल्लीत मी सर्वात जास्त काळ काम केलेलं आहे. भागवत कराड यांना कुठलेही निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भागवत कराड यांना कुण्याही बँकेच्या चेअरमन आणि अधिकाऱ्यांना बोलवून घेण्यास बंधन घातलं आहे. त्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button