राजकारण

जळगावपाठोपाठ बीडमध्ये भाजपला धक्का

पंकजा मुंडे समर्थक माजी आमदाराची राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थिती!

बीड : जळगाव महापालिकेमध्ये शिवसेनेनं जोरदार सर्जिकल स्ट्राईक करत भाजपच्या गडाला भगदाड पाडले आहे. त्यापाठोपाठ आता बीड भाजपमधील माजी आमदार तथा पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय केशव आंधळे यांनी आज जिल्हा बँक संदर्भात राष्ट्रवादीच्या बैठकीला हजेरी लावली. यामुळे पंकजा मुंडे यांना धक्का समजला जात आहे. भाजपाच्या ताब्यातील बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अगोदरच बँकेच्या अध्यक्षांनीच उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने भाजपची पीछेहाट होत असताना दुसरीकडे मात्र माजी आमदार थेट राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

विशेष म्हणजे या बैठकीमध्ये आंधळे यांनी 3 मिनिटाचे भाषण सुद्धा ठोकले. यावेळी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री आ. प्रकाश सोळुंके, माजी आमदार अमरसिंह पंडीत, आ.संदीप क्षीरसागर आ. बाळासाहेब आजबे यांची उपस्थित होते. त्यामुळे भाजपचे माजी आमदार राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याची चर्चा असून लवकरच प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे.

माजी आमदार केशव आंधळे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड मजूर महामंडळाचे माजी अध्यक्ष देखील होते तसंच ऊसतोड मजुरांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे धनंजय मुंडे यांनी आता या माजी आमदारांना आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून आजच्या राष्ट्रवादीच्या बैठकीला माजी आमदारांच्या हजेरी हे त्याचे उदाहरण आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर भाजपचा ताब्यातील जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली. त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये देखील भाजपाला हवं तेवढं यश मिळवता आलं नाही. आता होत असलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत देखील पीछेहाट होत असल्याने भाजपची व बीडमधील पंकजा मुंडे यांची ताकत कमी तर होत नाही ना असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे.
या निवडणुकीचे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील पडसाद उमटणार असल्याचे दिसून येत आहे. तसंच सहकारी संस्थांमधील वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परळी वैजनाथ बँकेच्या निवडणुका देखील या कालावधीमध्ये होणार आहे. त्या दृष्टिकोनातून पंकजा मुंडे यांनी या संदर्भात ठोस भूमिका नाही घेतली तर भविष्यात या निवडणुकीत भाजपला जड जाण्याची चिन्ह दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button