Top Newsराजकारण

भाजप, मनसेसह व्यापारी संघटनांचा ‘महाराष्ट्र बंद’ला विरोध

बेस्ट आणि एसटी बसचा बंदमध्ये सहभाग; शिवसेनेच्या संघटनेचा पाठिंबा

मुंबई : महाविकास आघाडीने उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्‍यांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला काही संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी भाजप आणि व्यापारी संघटनांनी मात्र याला विरोध दर्शवला आहे. दरम्यान, आता मनसेने देखील भाजप, व्यापारी संघटनांपाठोपाठ महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे उद्या सोमवारी बंद किती प्रमाणात यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

लखिमपूर खेरी येथे घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आम्ही देखील त्याचा निषेध करतो. परंतु महाराष्ट्रात सरकार मधीलच पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. यामागे नेमकं कोणते लॉजिक आहे कळत नाही. आधीच कोरोनामुळे गेले दीड दोन वर्ष व्यापारी आर्थिक संकटात आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत होतंय त्यात असे बंद व्यापाऱ्यांना परवडणारे नाहीत आणि निषेध करायचा तर अन्य मार्ग आहेत त्याचा अवलंब करावा बंदच का? सरकारच बंद करणार असेल तर गाऱ्हाणं मांडायचं तरी कोणाकडे? या बंदमध्ये सामिल न होता व्यापाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपली दुकाने चालु ठेवावीत, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी जाहीर केली आहे.

व्यापारी संघटनांचा विरोध

महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पुण्यापाठोपाठ मुंबईतील काही व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. उद्या दुकाने सुरुच राहतील. मात्र, आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. बंदमध्ये दुकानदारांना खेचू नका, असं आवाहन विरेन शहा यांनी मुंबई व्यापारी संघामार्फत केलं आहे. कोरोनानंतर बऱ्याच वेळाने दुकाने सुरु झाली आहेत. सध्या नोकरांचा पगार देणंसुद्धा जिकरीचं झालं आहे. आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे, असं सांगत विरेन शहा यांनी मुंबई व्यापार संघाची भूमिका मांडली.

भाजप रस्त्यावर उतरून विरोध करणार

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीने घोषणा केलेल्या ११ ऑक्टोबरच्या महाराष्ट्र बंदला जाहीर विरोध केला आहे. लखीमपूरमधील एका घटनेचं राजकीय भांडवल करण्याचा ढोंगीपणा हे लोक करत आहेत. आधीच टाळेबंदी करुन यांनी मुंबईकरांची रोजीरोटी संपवली होती. त्यातलाच हा आणखी एक प्रकार आहे. मात्र, मुंबईत भाजप प्राणपणाने या बंदला विरोध करेल. जर कुणी सरकारी दडपशाही करून किंवा पक्षीय दडपशाही करून मुंबईकरांना त्यांचे व्यवहार बंद करण्याचा प्रयत्न केला, तर भाजप रस्त्यावर उतरून याला विरोध करेल, असं भातखळकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्याचा महाविकास आघाडीने पुकारलेला बंद किती यशस्वी होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

बेस्ट, एसटी बसचा बंदमध्ये सहभाग; शिवसेनेच्या संघटनेचा पाठिंबा

लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून ठार मारले होते. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांनी ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदमध्ये मुंबईतील बेस्ट बस आणि एसटी बसचा समावेश असणार आहे. शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेने याला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दोन्ही वाहतूक सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे वाहतुकीवर उद्या परिणाम होणार आहे.

दुसरीकडे, उद्याच्या बंदमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन सहभागी होणार नाही. बेस्ट ही अत्यावश्यक सेवा आहे. अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असा शासनाचा निर्णय असताना बेस्ट बंदमध्ये सहभागी होऊ शकत नाही, बेस्ट कामगार सेना कर्मचाऱ्यांना बंदचे आवाहन करून राज्य सरकारच्या निर्णयाचं उल्लंघन करत आहे, असा आरोप कामगार नेते शशांक राव यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button