बोगसगिरी करणाऱ्या भाजप आमदाराला ५ वर्षांचा तुरुंगावास
लखनऊ : उत्तर प्रदेशातील भाजप आमदार इंद्र प्रताप तिवारी यांना न्यायालयाने ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. न्यायधीश पूजा सिंह यांनी निर्णय सुनावला असून एमपीएमएलए कोर्टाने आरोपी आमदार इंद्र प्रताप तिवारी यांच्या कोर्टात दाखल असलेल्या तिवारी यांना तुरुंगात टाकण्याचे आदेश दिले. तिवारी हे उत्तर प्रदेशच्या गोसाईगंज विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. कॉलेजमध्ये जमा केलेल्या बोगस मार्कलीस्टप्रकरणात न्यायालयाने त्यांना ही शिक्षा सुनावली आहे.
तिवारी यांनी १९९२ मध्ये बोगस मार्कलीस्टचा वापर करून पुढील वर्गात प्रवेश घेतला होता. महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य यदुवंश राम त्रिपाठी यांनी आरोप ठेवल्यानंतर पोलीस ठाणे राम जन्मभूमी येथे गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी इंद्र प्रताप तिवारी यांना तब्बल २८ वर्षांनंतर न्यायालयाने ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तिवारी यांच्यासह कृपानिधान तिवारी आणि फूलचंद यादव यांनाही ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
साकेतच तत्कालीन प्राचार्य यदुवंशराम त्रिपाठी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, आपल्या बोगस मार्कलीस्टच्या आधारे इंद्र प्रताप तिवारी यांनी महाविद्यालयात प्रवेश मिळवला होता. त्यामध्ये, फुलचंद यादव बीएससी भाग एक परीक्षा १९८६ च्या मुख्य परीक्षेत नापास झाले होते. त्यामुळे, बीएससी भाग २ प्रवेशासाठी पात्र ठरले नाहीत. मात्र, विद्यापीठाकडून जारी केलेल्या बॅक पेपरमध्ये हेराफेरी करून, षडयंत्र रचून बीएससी भाग 2 मध्ये प्रवेश मिळवला होता. तत्पूर्वी १९९० साली माजी विद्यार्थ्याच्या रुपाने त्यांनी बीएससी भाग 2 मध्ये परीक्षा दिली होती, त्यामध्ये ते परीक्षेत नापास झाले होते. तरीही, बीएससी भाग ३ मध्ये प्रवेश मिळवला होता.