मराठा आरक्षणाच्या विषयावर २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवा : हरिभाऊ बागडे
औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकारण सुरु झालंय. अशावेळी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजभवनावर जात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेलं पत्र मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द केलं. तसंच पत्रकार परिषद घेत आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेही भेटीची वेळ मागणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप आमदार हरिभाऊ बागडे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विधिमंडळाचं दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी केली आहे.
हरिभाऊ बागडे यांनी पत्रकार परिषद घेत विशेष अधिवेशनाची मागणी केलीय. राज्य मागासवर्ग आयोग नेमणे, आयोगाचा अहवाल स्वीकारणे, तो केंद्रीय आयोगाकडे पाठवणे, ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी त्यांनी केली आहे. मराठा समाजाचं आरक्षण मजबूत करण्यासाठी दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा, असं बागडेंनी म्हटलंय. यापूर्वी मराठा आरक्षणासाठी लोकसभेचं विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी केली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर विशेष अधिवेशन बोलावून तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवावं असं पाटील यांनी म्हटलंय.