राजकारण

गोव्यात भाजपच्या मंत्र्याकडून महिलेचे लैंगिक शोषण! काँग्रेसचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

पणजी : सावंत सरकारमधील एक मंत्री महिलेचे लैंगिक शोषण करीत असून मुख्यमंत्री ही त्याला पाठीशी घालत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसने केला आहे. १५ दिवसांत या मंत्र्याला मंत्रिमंडळातून काढून न टाकल्यास नावासह मंत्र्याला उघडे पाडण्याचा तसेच रस्त्यावर उतरण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी हा आरोप केला. मंत्र्याचे नाव त्यांनी उघड केले नाही. ते म्हणाले की, या मंत्राने सदर महिलेला घर देतो, नोकरी देतो, अशी आश्वासने देऊन वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले आणि धमकी देऊन तिला गर्भपात ही करायला लावला. या मंत्र्याने सदर महिलेशी केलेल्या संभाषणाचे ऑडिओ क्लिप्स, व्हॉट्सॲप चॅट, तसेच व्हिडिओ क्लिप्स मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवले असूनही त्यांनी कारवाई केली नाही. उलट हे पुरावे नष्ट केले. पोलिसांचा वापरही मुख्यमंत्र्यांनी केला. संबंधित मंत्री आणि मुख्यमंत्री दोघेही एका बेकायदा व्यवसायात भागीदार आहेत आणि म्हणूनच मुख्यमंत्री त्यांना पाठीशी घालत असावेत.

हवेत बाण मारू नका : भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे

काँग्रेसने केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांना प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, ‘चोडणकर यांनी मंत्र्याचे नाव न घेता हवेत बाण मारला आहे. राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या तोंडी अशी बेजबाबदार विधाने शोभत नाहीत. वैयक्तिक आरोप करताना त्यांनी मंत्र्याचे नाव घ्यावे. या प्रकरणात कथित पीडित महिलेने तक्रार केलेली नाही त्यामुळे आरोपाबाबत संशय घेण्यास वाव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button