राजकारण

मुंबईतील भाजप नेत्याच्या पत्नीवर अटकेची टांगती तलवार, रेश्मा खान यांचा जामीन फेटाळला

मुंबई : मुंबईतील भारतीय जनता पक्षाचे नेते हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे रेश्मा खानच्या विरोधात कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. बांगलादेशी नागरिक असताना बोगस कागदपत्रं वापरून भारतीय पासपोर्ट मिळवल्याच आरोप झाल्यानंतर खानच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आपली पत्नी बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील इस्लामपूर गावातील रहिवासी आहे, असा दावा हैदर आझम यांनी आरोपांनंतर केला होता.

रेश्मा खानला आधी सेशन्स कोर्टाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिले होते, कारण तिने केलेल्या याचिकेवर निर्णय प्रलंबित होता. या प्रकरणी तक्रारदार निवृत्त पोलिस निरीक्षक दीपक कुरुळकरचे वकील नितीन सातपुते यांनी रेश्मा खानला दिलासा देण्याला विरोध करत हस्तक्षेप अर्ज दाखल केला होता.

रेश्मा खानचा अटकपूर्व जामीन सोमवारी न्यायालयाने अर्ज नाकारल्यानंतर तिने आपल्या वकिलांमार्फत दोन आठवड्यांसाठी अंतरिम संरक्षण देण्याची मागणी केली. जेणेकरुन मुंबई उच्च न्यायालयात जाऊन अंतरिम दिलाशाची मागणी करता येईल. मात्र न्यायालयाने तिला अंतरिम दिलासा देण्यासंदर्भात याचिकेची दखल घेतली नाही आणि कुठल्याही प्रकारचे संरक्षण देण्यास नकार दिला.

हैदर आझम यांची पत्नी रेश्मा खान बांग्लादेशी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी नोव्हेंबर महिन्यात केला होता. हे प्रकरण माजी सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने दाबल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक कुरुळकर यांच्या १६ सप्टेंबर २०२० च्या जबाबाचा दाखला त्यांनी दिला होता. पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या समक्ष दिलेला पाच पानी जबाब मलिक यांनी उघड केला होता. तत्कालीन सह पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्या आदेशाने रेश्मा खान प्रकरणात कारवाई केली नाही, हैदर अली यांच्या पत्नीचा जन्म दाखला हा बनावट असल्याचं पोलिसांच्या जबाबात नमूद असल्याचा दावाही नवाब मलिक यांनी केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button