एका व्यावसायिकासाठी भाजप नेत्यांचा पोलिसांवर दबाव; काँग्रेसचा आरोप
मुंबई : एका व्यावसायिकासाठी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी मुंबई पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केलाय. रेमॅडेसीवीरच्या ६०००० इंजेक्शनचा मोठा साठा ब्रूक लॅबोरेटरीजच्या निर्यातदारांकडे लपवल्याची माहिती पोलिसांकडे होती. यात पोलिसांचा दोष काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय.
निर्यात बंदी झाल्यावर कंपनीने CDSCO ला आणि राज्य FDA ला स्टॉक कळविणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी संचालकाला बोलावले पण त्याने उडवाउडवी केली. दोन दिवसांनी तो आला. परंतु भाजप नेते इतके बिथरले की त्याच्या मदतीला स्वतः फडणवीस जी रात्रीसुध्दा धावले असे सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले.
कोरोना महामारीमध्ये रेमडेसीवीरची प्रचंड कमतरता असताना पोलिसांकडून काय अपेक्षा असेल? चौकशीसाठी ते कोणाला बोलावू शकत नाहीत? भाजपा नेते जनसामान्यांसाठी अशी पावले उचलतात का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी डीसीपी मंजुनाथ सिंगे आणि टीमचे आभार मानले आणि भाजपा नेत्यांचा निषेध केला.