महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजप नेते उतावीळ : जयंत पाटील
मुंबई : विरोधकांच्या सध्या सुरु असलेल्या हालचाली पाहता महविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप नेते उतावीळ झाल्याचे दिसत आहे. हा एक प्रकारे भाजप नेत्यांचा डाव आहे, असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. भाजपचे नेते दोन दिवस थांबा अजून १-२ जणांची विकेट जाईल असे दावे करत आहेत. त्यानंतर एनआयमध्ये गेलेले पत्र प्रसार माध्यमांच्या हाती लागणे आणि त्यात आणखी एक दोन नावे येणे, यावरुन एक स्पष्ट होतंय की भाजपचे नेते बोलतात, त्यानंतर तसंच बाहेर येत आहे. याचा अर्थ तपास सुरु आहे की राजकारण, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, याकडे पाटील यांनी लक्ष वेधले.
जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत विरोधकांचा समाचार घेताना सचिन वाझेचा म्होरक्या कोण? असा सवाल केला.स्फोटके भरलेली गाडी ठेवली हे सगळं बाजूला राहिलं आणि ज्याच्यावर आरोप आहे तो काय बोलतो तेच बाहेर येतंय. ज्याच्यावर खुनाचा आरोप आहे, अशा व्यक्तीवर विश्वास कसा ठेवायचा? तपास स्फोटकांचा, तपास खुनाचा, पण चर्चा वेगळीच होते. वाझेच्या बरोबर कोण आहे, म्होरक्या कोण आहे, त्याला अटक का होत नाही? असा सवाल देखील पाटील यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर ती सात दिवसात करायची असते इथे तर किती तरी महिने झाल्यावर असे आरोप केले जात आहेत. इथे लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी नको त्या चर्चा केल्या जात आहेत. जीएसटी परतावा कमी दिला तर बोलायचं नाही का? केंद्राने अत्याचार केले तर बोलायचं नाही का? असेही पाटील म्हणाले.