राजकारण

राष्ट्रवादीचा आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’; भाजपचा पलटवार

मुंबई : गेल्या काही कालावधीपासून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आरोपाची भर पडली असून, भाजपकडून याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादीकडून करण्यात आलेला आरोप म्हणजे ‘आधी चोऱ्या, आता बहाणे’, असा प्रकार असल्याचा पलटवार भाजपने केला आहे.

दिल्ली व मुंबईत आयपीएस अधिकाऱ्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी बैठका घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप नवाब मलिक यांनी केला. नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांना विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

राज्य सरकार अपयशी ठरले की केंद्रावर आरोप करायचे, कोरोना वाढला की सामान्य जनतेवर आरोप करायचे, हेच सुरू आहे. आरोप करण्याशिवाय या सरकारचे मंत्री काहीच करीत नाहीत. रोज सकाळी मीडियाला अजेंडा ठरवून देऊन सरकार चालत नसते, त्यासाठी परिश्रम करावे लागतात. आरोप झाले की कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार, अशी विधाने करायची आणि नोटीस आली की बिळात लपून बसायचे. तुम्ही काही केले नसेल तर चौकशीला का घाबरता, तुमचे सहकारी दोन-तीन महिन्यांपासून का फरार आहेत, अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

बेळगावमधील भाजपचा विजय म्हणजे जणू मराठी माणसाचा पराभव आहे, असा अपप्रचार काही नेते करत आहेत. पण, भाजपच्या विजयी ३६ नगरसेवकांमध्ये २३ मराठी आहेत, हे सांगितले जात नाही. निव्वळ भावनात्मक विषय करून सामान्य जनतेची फसवणूक करता येत नाही. निवडणूक निकालावर शंका उपस्थित करून शिवसेना आता काँग्रेसच्या अधिक जवळ गेली आहे. ईव्हीएमवर शंका उपस्थित करणारी पूर्वी एकमेव गलितगात्र काँग्रेस होती. शिवसेनेलाही त्याच रांगेत जाऊन बसण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला प्रवीण दरेकरांनी लगावला.

भानगडी करणारेच सरकारमध्ये होते तर ईडी काय करेल?

राज्यातील नेत्यांना नाहक त्रास देण्यासाठीच ईडीच्या कारवाया सुरू असून याआधी एकाचवेळी ईडीच्या इतक्या कारवाया कधी पाहिल्या होत्या का?, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. त्यावर आता भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात एकाचवेळी ईडीच्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? असं म्हणतात. पण पूर्वीच्या काळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तर ईडी काय करेल?, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

शरद पवारांनी पुण्यातील एका नागरी सहकारी बँकेच्या कार्यक्रमात राज्यात ईडीकडून सुरू असलेल्या कारवायांवर तिखट शब्दांत प्रतिक्रिया दिली. राज्यातील नेत्यांना ईडीच्या कारवायांमधून नाहक त्रास दिला जात असल्याचं शरद पवार म्हणाले. केशव उपाध्ये यांनी पवारांच्या विधानाबाबत एक ट्विट केलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात एकाचवेळी ईडीच्या इतक्या कारवाया याआधी कधी पाहिल्या होत्या का? पूर्वीच्याकाळी भानगडी करणारेच सरकारमध्ये असतील तर ईडी काय करेल? बिनदिक्कत सुरू होतं. कारण सैयां भये कोतवाल, अब डर काहे का? आता परिस्थिती बदलली त्यामुळे कारवाया होत आहेत”, असं ट्विट केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button