पणजी/मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना तिकिट देण्यावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे नेते व गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत यांना नटसम्राटमध्ये भूमिका द्यायला पाहिजे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
जर उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहणार असतील, तर मनोहर पर्रिकरांना आदरांजली म्हणून सर्व राजकीय पक्षांनी विरोधात उमेदवार देऊ नये, असे आवाहन करत मनोहर पर्रिकरांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असून त्याला अपमानित केले जात आहे. त्याची औकात काढली जात आहे. भाजपने उत्पल पर्रिकरांना तिकीट देण्यासाठी इतका वेळ का लावला? भाजपवाले बोलघेवडे आहेत. तिकीट का थांबवले हा मोठा प्रश्न आहे, अशी टीका केली होती. यावर फडणवीस यांनी पलटवार केला आहे.
उत्पल पर्रिकरांच्या बाबतीत परिस्थितीनुसार उत्तर मिळणार आहे. संजय राऊतांना नटसम्राटमध्ये भूमिका द्यायला पाहिजे. कारण ते सकाळी वेगळे आणि संध्याकाळी वेगळे बोलायची उत्तम भूमिका करू शकतात. मनोहर पर्रिकर आजारी होते, तेव्हा नाकात नळी असताना त्यांनी विधानसभेमध्ये जाऊन बजेट मांडले होते, तेव्हा याच संजय राऊतांनी गोव्याचे मुख्यमंत्री आणि गोव्यातले सरकार आजारी आहे, सरकार चालवणे अयोग्य आहे, असे सांगितले होते. आता तेच संजय राऊतांचे मगरीचे अश्रू वाहत आहेत आणि आता ते उत्पल पर्रिकरांबद्दल बोलत आहेत. मनोहर पर्रिकर जेव्हा आजारी होते, तेव्हा तुमची काय भूमिका होती, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे राजकीय सोयीची भूमिका घेणे बंद केले पाहिजे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
७९२ मतं मिळालेली शिवसेना गोव्यात सत्ता स्थापन करणार का? : चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना आरसा दाखवलाय. पाटील यांनी गत पंचवार्षिक विधानसभा निवडणुकांची आकडेवारीच सांगितली आहे. त्यामध्ये, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं उत्तर प्रदेश व गोव्यात किती जागा लढवल्या, किती मतं मिळवली आणि निकालात या दोन्ही पक्षांची झालेली वाताहत त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
शिवसेना नेते संजय राऊत हे गोवा आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकांबाबत सातत्याने विधान करत आहेत. शिवसेनेला गोव्यात २०१७ च्या निवडणुकीत एकूण ७९२ मतं मिळाली, ही टक्केवारी १.०३ टक्के एवढी आहेत. मला सुरुवातीला वाटलं साईटमध्ये काहीतरी गडबड असेल. पण, ही आकडेवारी खरी आहे. आता, हे गोव्यात सरकार बनविणार आहेत, सरकार बनविणाऱ्यांना मदत करणार आहेत, काहीतरी महासंघटन करणार आहेत.
उत्तर प्रदेशात गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं ५७ जागा लढवल्या, तिथं ११ कोटी मतदारांपैकी ८८ हजार ५९५ मतं मिळाली आहेत. शिवसेनेचं ५७ पैकी ५६ जागांवर डिपॉझिट जप्त झालं आहे. सरासरी १५५४ हजारांएवढी मतं आहेत. अन् हे टिकैत यांना बरोबर घेणार आहेत, सपाला आवाहन करणार आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला गतनिवडणुकीतील निकालाचा आरसा दाखवला आहे.
युपीमध्ये ४०३ पैकी ३० जागा राष्ट्रवादीने लढल्या होत्या, या ३० पैकी ३० जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालंय. राष्ट्रवादीला एकूण ३३ हजार ४९४ मतं त्यांना मिळाली. तर, गोव्यात १७ जागांपैकी १६ जागांवर डिपॉझिट जप्त झाली आहे. येथे एकूण मतं मिळाली २०,९१६, अशी आकडेवाडी पाटील यांनी सांगितली. तसेच, कसला गमछा चाललाय, असे म्हणत पाटील यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेवर जोरदार प्रहार केला.
तुम्ही संजय राऊत यांची वक्तव्ये चालवता म्हणून ते फारच वाढत चालले आहे. मनोहर पर्रिकरांच्या मुलाबद्दल त्यांनी कशाला भाष्य करायचे? तुमचे तिथे ऐकायला कोण बसले आहे? हिंमत असेल तर संजय राऊतांनी गोव्यातील एक मतदारसंघ लढवावा. पंतप्रधान मोदी गुजरातमधून जातात आणि उत्तर प्रदेशातून लढतात तसे तुम्हीही लढा. आपच्या पक्षाकडे अध्यक्ष आहे, पण बाकीच्या पक्षांना अध्यक्ष ठरवण्याची सवय नाही. पर्रिकरांच्या मुलाला भाजपने तिकीट दिले, तर तुम्ही सर्व जण निवडणूक लढणार नाही असे सांगा, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
काशीचा घाट म्हणजे मृत्यू, फडणवीसांबद्दलच्या त्या विधानावरुन चंद्रकांत पाटील संतप्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत विधान करणारे भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना यापूर्वी कात्रजचा घाट दाखवला होता आणि आताही बोलत राहिले तर शरद पवार काशीचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला होता. त्यावरुन, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, काशीचा घाट म्हणजे मृत्यू… असेही पाटील यांनी अधोरेखित केले.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्या विधानवरुन संताप व्यक्त केला आहे. काशीचा घाट म्हणजे मृत्यू… नाना पटोले म्हणतात मोदींना मारेन, नवाब मलिक म्हणतात यांना काशीचा घाट दाखवू, म्हणजे सगळं अंडरवर्ल्ड चाललंय की काय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ह्याला मारू, त्याला मारू, काय दहशतवाद चाललाय. देवेंद्र फडणवीसांनी ५ वर्षे पूर्णपणे मुख्यमंत्री कार्यकाळ केला आहे. वसंतरावाई नाईक यांच्यानंतर तेच एकमेव आहेत. सध्या ते विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना काशीचा घाट दाखविण्याची भाषा केली जात आहे.
भाजपच्या राज्यातील गावागावातील कार्यकर्त्यांनी प्रिकॉशनरी म्हणजे सावधगिरीची तक्रार नवाब मलिक यांच्याविरुद्ध केली पाहिजे. नवाब मलिक उघडपणे म्हणाले आहेत, की फडणवीसांना काशीचा घाट दाखवू. काशीचा घाट प्रसिद्ध आहे तो मृत्यूनंतर काशीच्या घाटावर अंत्यविधी झाल्यास त्याला स्वर्ग मिळतो, असे म्हणतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.