महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चारीमुंड्या चीत करू; आशिष शेलारांचा दावा
ठाणे: महापालिका निवडणुका पुढे ढकलण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महापालिका निवडणुका वेळेवर जाहीर करण्याचं धाडस शिवसेनेने दाखवावं. आम्ही त्यांना चारीमुंड्या चीत केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा आशिष शेलार यांनी केला आहे.
शेलार यांनी ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा केला. महापालिका निवडणुका वेळेवर जाहीर करण्याचे धाडस शिवसेनेने दाखवावे. मुदती आधीच निवडणूक घ्यावी किंवा मुदत संपल्यानंतर निवडणूक पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. याचाच अर्थ शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. कोविड काळ बघून वेळेवर निवडणुका घेण्यात यावी, अशी आमची शिवसेना आणि निवडणूक आयोगाला विनंती आहे. वेळेवर निवडणूक झाली तर शिवसेनेला चारीमुंड्या चीत करण्याची भाजपची तयारी आहे, असं शेलार म्हणाले.
राजकारणात प्रत्येकाला स्वतःची आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं भाषण झालं. हे भाषण मी ऐकलं नाही. कार्यक्रमाच्या बातम्या वाचल्या. या कार्यक्रमात पवार स्वत:च्या पक्षाबद्दल कमी बोलले आहेत. शिवसेना शब्द पाळणारा, विश्वास असणारा पक्ष असल्याचं पवार म्हणाले. पवारांनी इतर पक्षाची एवढी स्तुती का केली? याचं स्पष्टीकरण राष्ट्रवादीनेच दिलं पाहिजे, असं ते म्हणाले.
शेलार यांनी नवी मुंबईच्या विमानतळाच्या मुद्द्यावरही भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला आमचा विरोध नाही. आघाडी सरकारने याबाबत सर्व समावेशक निर्णय घेतला पाहिजे. दि. बा. पाटील यांचे कार्यही मोठे आहे. ज्या ठिकाणी दि. बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी सुरू आहे. त्याला आमचा विरोध नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. लसीकरणाबाबतची शिवेसनेची घोषणा पोकळ आहे. हा पोकळ वासा आहे. राजीनामे खिशात भिजून गेले. आता रोख रकमेचा चेकही पावसात भिजून गेला, असं विचित्र चित्रं आहे, असा चिमटाही त्यांनी काढाला.