अनिल देशमुख गायब का आहेत? राष्ट्रवादीने खुलासा करण्याची भाजपची मागणी
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागल्याचे पाहायला मिळत आहे. अनेकदा नोटीस बजावूनही ईडीसमोर चौकशीसाठी उपस्थित राहणार नसल्याची भूमिका अनिल देशमुख यांनी घेतली आहे. दुसरीकडे, सीबीआयने अनिल देशमुख यांच्या वकिलास थेट अटक केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे म्हटले जात आहे. अशातच आता भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनिल देशमुख यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. अनिल देशमुख गायब का आहेत, असा सवाल करत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत, प्रगत राज्याचा माजी गृहमंत्री अनेक महिन्यांपासून गायब आहे. महाराष्ट्राला ही गोष्ट भूषणावह नाही. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गायब होण्याबाबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खुलासा करावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनिल देशमुख यांच्यावर टीकास्त्र सोडले.
अनिल देशमुख यांनी राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देताना सांगितले होते की, सीबीआय, ईडीकडून होणाऱ्या चौकशीला सर्व प्रकारचे सहाय्य करू. मात्र राजीनामा दिल्यानंतर देशमुख यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाला कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही. आपल्याला अटक होऊ नये, यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या पातळीवर देशमुख यांनी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही देशमुख यांचा युक्तीवाद अमान्य केला आहे. आता देशमुख हे गायब झाले आहेत. अनिल देशमुख हे का गायब आहेत? ते जनतेसमोर तपास यंत्रणांसमोर का येत नाहीत? याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसने तातडीने करावा, असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी धार्मिक व राजकीय कार्यक्रम थांबविले पाहिजेत, अशा आशयाचे वक्तव्य केले आहे. मात्र गणेशोत्सवासारखा सण तोंडावर आल्यावरच मुख्यमंत्र्यांना अशी वक्तव्ये का करावीशी वाटतात याचे आश्चर्य वाटते. मंदिरे, चित्रपटगृहे वगळता राज्यात सर्व व्यवहार सुरळीत चालू आहेत. फक्त मंदिरांत जाण्याने कोरोना पसरतो का? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी करण्याची गरज आहे, असे केशव उपाध्ये यांनी सांगितले.