Top Newsराजकारण

राजकारण तापले; नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक

मुंबई : अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मलिक यांच्या मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

दुसरीकडे मलिक यांची पाठराखण करण्यासाठी महाविकास आघाडी पुढे सरसावली असून कसल्याही परिस्थितीत मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायचा नाही, असा पवित्रा घेत या कारवाईविरोधात राज्यभर आंदोलन करीत जनतेच्या दरबारात जाण्याचा इशारा आघाडीने दिला आहे. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तपास यंत्रणांवर दबाव का आणत आहेत? त्यांची बदनामी का करीत आहेत? असा सवाल करीत भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी ‘नवाब बेनकाब हो गया है’, असे म्हटले आहे.

लोकशाहीविरोधी कारवाई : वळसे-पाटील

मलिक यांना अशा प्रकारे ईडीच्या कार्यालयात घेऊन जाणे लोकशाहीच्या आणि सामान्य माणसाच्या हक्कांच्या विरोधात आहे. केंद्रीय यंत्रणांनी कारवाई करण्याआधी कोणीतरी टीव्ही किंवा ट्विटच्या माध्यमातून माहिती प्रसारित करीत असतो. याचा अर्थ हे सर्व ठरवून केले जात आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात आता सामुहिकरित्या लढा : पटोले

राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचलनालयाची (ईडी) कारवाई ही सुडबुद्धीने केलेली आहे. नवाब मलिक सातत्याने केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उठवत होते. केंद्र सरकारविरोधात आवाज उठवल्यानेच ईडीच्या माध्यमातून कारवाई केलेली असून आम्ही नवाब मलिक यांच्या पाठीशी आहोत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

ईडीच्या कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया देताना नाना पटोले पुढे म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईचे आश्चर्य वाटत नाही कारण केंद्र सरकारच्या विरोधात जो कोणी बोलतो त्याच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई केली जाते. यापूर्वीही विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांवर अशीच कारवाई केलेली आहे. भाजपाचा हा नवा धंदा आहे. विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. केंद्रात सत्ता असल्याचा माज भाजपाला असून अशा कारवायांविरोधात आता चर्चा करून आम्ही सामुहिकरित्या लढा देणार आहेत. महाराष्ट्राची बदनामी करुन सत्ता मिळवण्यासाठी हे सर्व चालले असून जनता हे पहात आहे.

विरोधी पक्षातील काही लोक वारंवार खोटे व हास्यास्पद आरोप करुन महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री व नेत्यांची बदनामी करत आहेत. मुख्यमंत्र्यांसंदर्भातही असेच आरोप केले जात आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या प्रसार माध्यमांनाही अशाच प्रकारच्या कारवायांना सामोरे जावे लागले आहे. उद्या माझ्यासह कोणाचाही नंबर लागू शकते परंतु हे फार काळ चालणार नाही. हे सर्व चुकीचे असून महाराष्ट्राची जनता भाजपाला धडा शिकवेल असे पटोले म्हणाले.

ईडीवाले तोंडात देणार विडी – राणे

मलिक यांच्याबाबतीत जे घडले ते कधीतरी होणारच होते. आता ‘डी’ आणि ‘ए’ की आणखी काही गँगशी त्यांचे संबंध आहेत, ते उघड होतील. मलिकांचे अनुकरण कोणी करू नये. आता काय ते बोला म्हणावे त्यांना ईडीसमोर, नाही तर तोंडात विडी देणार ते ईडीवाले, अशी टिपण्णी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली.

भाजपमध्ये दोन मतप्रवाह !

एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटालांनी मलिकांच्या राजीनाम्यासाठी दबाव बनवायला सुरूवात केली आहे, तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांननी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. बॉम्बस्फोटातील आरोपीची जमीन विकत घेऊनही असा आव आणत आहेत की देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील योद्धे आहेत, अशी सडकून टीका मुनगंटीवर यांनी मलिकांवर केली आहे.

आम्ही राजकारणात आहे म्हणून आम्ही राजीनामा मागायचा का? असा सवालही मुनगंटीवार यांनी विचारला आहे. त्यामुळे कुजबूज सुरू झाली आहे. तर दुसरीकडे. नवाब मलिक यांना अटक केलायंनातर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तातडीने त्यांचा राजीनामा घेतील. अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा थेट इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे. ज्या ज्या मंत्र्यांवर आरोप होऊन अटक होईल त्या सगळ्यांना राजीनामा द्यावा लागेल. अनेक मंत्री, नेते यांच्यावर गंभीर आरोप आहेत.असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

जसे जसे हे लाल गठ्ठे उघडतील..; राष्ट्रवादीला खुलं आव्हान

मलिक यांना अटक केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करुन मलिक आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. एकप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला चॅलेंजच दिले आहे. मलिक यांच्या कुटुंबीयांतील सदस्यांच्या नावाने असलेल्या लाल गठ्ठ्यांचा फोटो शेअर करत, जसे जसे हे लाल गठ्ठे उघडतील, तसे तेसे मियाँ नवाब मलिक यांचे कांड देशासमोर येतील, असे ट्विट मोहित कंबोज यांनी केलंय.

कंबोज यांनी संजय राऊतांनाही लक्ष्य केलं आहे. महाभारतातील एक श्लोक ट्विट करुन राऊत यांच्या ट्विटला कंबोज यांनी प्रत्युत्तर दिलय. साहेब, दहशतवादाला साथ देणारे कंस आणि रावण नेहमीच मारले गेले आहेत, यापुढेही मारले जातील, असे कंबोज यांनी म्हटलं आहे.

 

भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार दाखवली

भाजप नेते मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांच्या अटकनंतर तलवार दाखवली आणि हेच प्रकरण त्यांना महागात पडलंय. कारण या प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी मोहित कंबोज यांच्या घराचा दरवाजा ठोठावला आहे. मोहीत कंबोज हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून वादत सापडलं आहे. मोहित कंबोज यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोपही महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये केलेले आरोप

नवाब मलिक यांच्या कंपनीने १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह वली खान, मोहम्मद सलीम पटेल यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचे म्हटले. खान याला १९९३ला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. तो टायगर मेमनचा साथीदार होता तसेच बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, मुंबई महापालिकेत बॉम्ब कुठे ठेवायचा, याची रेकी त्याने केली होती. त्यानेच टायगर मेमनच्या वाहनात आरडीएक्स लोड केले होते. दुसरी व्यक्ती मोहम्मद सलीम पटेल आहे, जो दाऊद इब्राहिमचा जवळचा असून, तो हसीना पारकरचा ड्रायव्हर, बॉडीगार्ड असल्याचे सांगितले होते. तसेच, नवाब मलिकचे अंडरवर्ल्डशी संबंध असून, दिवाळीनंतर बॉम्बस्फोट करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. पुढे हे पुरावेदेखील ईडीकडे सादर केले. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील गोवावाला कंपाउंड येथे असलेली तीन एकर जमीन केवळ २० ते ३० लाखांना विकली गेली, तर त्याचा बाजारभाव साडेतीन ते पाच कोटी असल्याचा आरोप होता.

मलिक म्हणाले हाेते…

दीड लाख फूट जमीन कवडीमोल भावात माफियांकडून खरेदी केल्याचा आरोप आहे. पण प्रत्यक्षात तिथे एक को-ऑपरेटिव्ह सोसायटी आहे.
जी १९८४ मध्ये स्थापन झाली होती. याला गोवावाला कंपाैंड म्हणतात. मुनिरा पटेल यांच्याकडून विकास हक्क घेऊन रस्सीवाला यांनी त्यावर घरे बांधून विकली होती. त्याच्या मागे आमचे गोदाम आहे. ते मुनिरा यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतले होते. तिथे आमची चार दुकाने होती. मुनिरा पटेल यांनी सलीम पटेल यांना पॉवर ऑफ ॲटर्नीचे अधिकार दिले होते, आम्ही त्यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या गोदामाची मालकी घेतली. त्यावेळी जी किंमत होती, तीच देण्यात आली. आम्ही मालकिणीकडून जमीन घेतली, मालकीण म्हणाली की, सलीम पटेल हे माझे पॉवर ऑफ ॲटर्नी आहेत, यांच्यासोबत सर्व व्यवहार करा. त्यानुसार व्यवहार झाल्याचे त्यांनी नमूद केले होते. ईडीकडून याच मालमत्तेच्या खरेदी व्यवहारप्रकरणी अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

दाऊद विरोधात ३ फेब्रुवारीला एनआयएचा गुन्हा दाखल

दाऊद विरोधात ३ फेब्रुवारीला एनआयएने गुन्हा दाखल केला. मनी लॉन्ड्रिंग, ड्रग्ज तस्करी तसेच अन्य गुन्ह्यांत दाऊदचा सहभाग आहे, असे ईडीचे एएसजी अनिल सिंग यांनी न्यायालयात सांगितले. तसेच, मलिक आणि दाऊद यांच्यात कसे संबंध आहेत, हे देखील त्यांनी न्यायालयात सांगितले.

दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकर दाऊदचा कारभार पाहत होती. तिच्याकडून मलिक यांनी दाऊदची बेनामी संपत्ती विकत घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. दाऊदची २०० कोटी रुपयांची संपत्ती कमी किमतीत विकत घेतली. हा व्यवहार रोखीने झाला. त्यात ५५ लाखांचा व्यवहार झाला. मलिक यांच्या कुटुंबाच्या एका कंपनीकडे या संपत्तीची मालकी आहे. या कंपनीवर मलिक यांचा मुलगा संचालक आहे. काहीकाळ ही कंपनी मलिक यांच्या नियंत्रणाखाली होती, असा आरोप सिंग यांनी कोर्टात केला. इतकेच नाही तर कुर्ल्यातील मालमत्ता मरियम आणि मुनिरा या दोघींच्या नावावर करण्यात आली होती. ही जमीन मुळात दाऊद गँगच्या हस्तकांशी संबंधित होती. ही जमीन १९९३ च्या बॉम्ब स्फोटातील आरोपी सलीम पटेलची होती आणि तो अंडरवर्ल्डशी संबंधित होता. ती संपत्ती आता मलिक यांच्या कंपनीकडे आहे, असेही सिंग यांनी न्यायालयात सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button