Top Newsराजकारण

तु्म्हाला हिशोबच करायचा तर कधीपण करु; आ. शिवेंद्रराजेंचे शशिकांत शिंदेंना थेट आव्हान

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये माझ्या पराभवासाठी १०० टक्के आ. शिवेंद्रराजे भोसले जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आ. शशिकांत शिंदे यांनी केला होता. यावर शिवेंद्रराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन शिंदेंनी केले होते. ‘आता तुम्हाला हिशोब करायचा असेल तर आमची पण तयारी आहे. कधीपण हिशोब करु एवढं लक्षात ठेवा,’ अशा शब्दात शिवेंद्रराजे यांनी शशिकांत शिंदे यांना आव्हान दिलं आहे.

शिवेंद्रराजे यांनी विजयी उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांच्या सत्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी शशिकांत शिंदेंना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवेंद्रराजे म्हणाले की, शशिकांत शिंदे यांनी स्वतःच्या चुका आणि स्वतःच्या बगलबच्चांच्या अडचणी त्यांनी निर्माण केल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्यांवर खापरं फोडणं बंद करून योग्य पद्धतीने राजकारण करावं. धोपटशाहीचा काही उपयोग होत नाही, कारण प्रत्येकामध्ये उत्तर देण्याची धमक आहे. कुणाचा संसार हा कुणामुळे चालत नाही. हिशोब चुकता करतो अशी भाषा वापरुन कोण घाबरणार नाही. तुम्हाला हिशोब चुकता करायचा असल्यास आमचीही हिशोब चुकता करायची जबाबदारी आहे. कधीपण हिशोब चुकता करु एवढं लक्षात ठेवा असा इशाराच शिवेंद्रराजे यांनी दिला आहे.

राजे म्हणाले की, माझ्यावर खापर फोडून सगळ्या गोष्टींना मी जबाबदार आहे आणि राष्ट्रवादीचे नेते जबाबदार आहेत. कुणाला हौस आहे, तुमच्या मागे लागायला. ते राष्ट्रवादीचे नेते म्हणाले परंतु त्यांचा रोख कुणाकडे हे मला माहिती नाही. कारण त्यांनी नाव नाही घेतलं. ते म्हणाले जिल्ह्यातील मोठा नेता होता. आता सगळ्यांनाच कामधंदा नव्हता की काय? जिल्ह्याचे राजकारण जिल्हा बँकेच्या भोवती फिरत होते की काय? मलाच कळत नाही. उगच सहानुभुती मिळवण्यासाठी हा सर्व प्रयत्न सुरु असल्याचे शिवेंद्रराजे यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीतील पराभवावर शशिकांत शिंदे यांनी भूमिका मांडताना आरोप केला की, जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये १०० टक्के राजकारण झाले. काही लोकांना पाडण्याच्या संदर्भात १०० टक्के निर्णय झाला. जिल्ह्यातील अनेक लोकांनी याला मदत केली आहे. तर काही लोकांनी अप्रत्यक्षपणे निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. शशिकांत शिंदेंच्या पराभवाला १०० टक्के शिवेंद्रसिंहराजे जबाबदार आहेत. यामागे फार मोठे षडयंत्र आहे. पक्षाच्या आदेशाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आणि राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्णयाच्या बाहेर जाऊन काहीही कऱणार नाही. परंतु सध्याची परिस्थिती पाहता हा विषय गांभीर्याने घ्यावा अशी इच्छा शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button